धाराशिव: मंडळी, धाराशिवच्या राजकारणाची ही वेब सिरीज रोज नवा एपिसोड घेऊन येत आहे! काल पालकमंत्री सरनाईक यांनी २६८ कोटींच्या स्थगितीमागचं ‘गुपित’ (जे त्यांच्याच कार्यकर्त्यांना म्हणे आधीच माहीत होतं!) उघड करून खळबळ उडवून दिली. पण आजची कथा आहे एका गाजलेल्या ‘अल्टिमेटम’ची आणि त्यानंतर गायब झालेल्या ‘ऍक्शन’ची!
या नाटकात आता जोरदार एन्ट्री झाली आहे धाराशिवचे ‘शिक्षण सम्राट’ सुधीर पाटील उर्फ ‘आण्णां’ची. (ओळख: ७० टक्के शिक्षण संस्था चालक, ३० टक्के राजकारणी, आणि १०० टक्के चर्चेतले व्यक्तिमत्व!). हे आण्णा काही महिन्यांपूर्वीच भाजपमधून थेट शिवसेना शिंदे गटात डेरेदाखल झाले आहेत. (त्यांचं आणि माजी पालकमंत्री तानाजी सावंतांचं का पटलं नाही, किंवा त्यांच्या वडिलांच्या पुतळ्याचं काय झालं, हे किस्से आपण नंतर कधीतरी चघळूया!).
तर, मूळ मुद्दा! याच आण्णांनी काही दिवसांपूर्वी एकदम ‘सिंघम’ स्टाईलमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. भाजप आमदार राणा पाटलांवर चौफेर टीका तर केलीच, पण थेट दंड थोपटून जाहीर केलं होतं की, “जर येत्या २१ तारखेपर्यंत (हो हो, गेल्या एप्रिल महिन्याची २१ तारीख!) कामांवरची स्थगिती उठली नाही, तर मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार!”
आता आण्णा उपोषणाला बसणार म्हटल्यावर वातावरण तापलं होतं. कारण आण्णांनी आवाज दिला की त्यांच्या शिक्षण संस्थेतले हजार-पाचशे लोक तरी जमा होतातच, हा इतिहास आहे. सगळ्यांच्या नजरा होत्या २१ तारखेकडे आणि कलेक्टर कचेरीसमोरच्या संभाव्य मंडपाकडे.
पण… मंडळी, इथंच तर खरी गंमत आहे! कॅलेंडरवरची २१ एप्रिलची तारीख कधीची उलटून गेली. आज २ मे (२०२५!) उजाडला. २६८ कोटींची स्थगिती काही उठली नाही… आपले मुंबईकर पालकमंत्री सरनाईक साहेब आले आणि गेले पण आण्णांच्या उपोषणाचाही पत्ता नाही! ना मंडप, ना घोषणा, ना आण्णा! सगळं शांत शांत!
आता झालंय असं की, आण्णांच्याच पक्षातले काही कार्यकर्ते कान खाजवत विचारायला लागलेत, “काय राव, स्थगिती तर उठली नाही, मग आण्णांनी उपोषणाचं काय केलं? त्यांची २१ तारीख नेमकी कुठल्या कॅलेंडरमध्ये होती?” कुणीतरी मिश्किलपणे म्हणालं, “बहुतेक आण्णा शुभ मुहूर्ताची वाट बघत असावेत!”
थोडक्यात काय: धाराशिवच्या राजकारणात सध्या स्थगिती, भाऊबंदकी, इस्तीफा ऑफर आणि आता ‘हरवलेल्या उपोषणाची’ भर पडली आहे. २६८ कोटींचं भिजत घोंगडं कायम आहे, महायुतीतला तणाव कायम आहे, आणि आता ‘आण्णांची २१ तारीख’ कधी येणार, या प्रश्नाचं उत्तरही गुलदस्त्यात आहे! बघूया, पुढच्या एपिसोडमध्ये काय नवीन ट्विस्ट येतोय!