मंडळी, कान टवकारा! आपल्या धाराशिव जिल्ह्याच्या राजकीय आखाड्यात लवकरच धुळवड उडणार आहे, कारण जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका दारावर टकटक करत आहेत. आता निवडणुका म्हटल्यावर काय विचारता राव? जिल्ह्यात राजकीय हालचालींना असा काही वेग आलाय, जणू काही ऑलिम्पिकची शर्यत सुरू झालीये!
अनेकांना रात्री झोपेत जिल्हा परिषदेची खुर्ची नाहीतर नगरसेवकपदाचा हार दिसू लागलाय. काहींना तर “मी मेंबर झालो तर…” किंवा “मी नगरसेवक झालो की…” अशी गोड स्वप्न पडू लागली आहेत. आता या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी सगळी नेतेमंडळी अचानक ‘जनता दरबार’ नावाचा नवा इव्हेंट घेऊन मैदानात उतरली आहेत. जणू काही इतके दिवस जनतेच्या समस्या अदृश्य होत्या आणि आता निवडणुकीच्या तोंडावरच त्यांना साक्षात्कार झालाय!
आपले आमदार आता लोकांच्या समस्या सोडवण्याचं ‘उत्कृष्ट नाटक’ सादर करत आहेत. बिच्चारी जनता! सरकारी अधिकाऱ्यांकडे हेलपाटे मारून मारून ज्यांच्या चपला झिजल्या, ज्यांच्या फाईलींवर धुळीचे थर साचले, त्यांच्या समस्या आता हे नेते चुटकीसरशी सोडवणार म्हणे! व्वा! क्या बात है! म्हणजे इतके दिवस अधिकारी ऐकत नव्हते, आता आमदारांनी सांगितलं की लगेच दिवे लागणार की काय? जादूची कांडी फिरणार बहुतेक!
आजच बघा ना, आपल्या धाराशिवच्या शासकीय विश्रामगृहात भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी एकदम ‘जनसेवा’ मोडमध्ये येत जनता दरबार भरवला. टाळ्या! पण थांबा, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त! तिकडून ठाकरे सेनेने लगेच गुगली टाकली. ते म्हणतात, “अहो, कसला आलाय जनता दरबार? तो तर निव्वळ ‘कार्यकर्ता दरबार’ होता!”
आता सामान्य मतदार राजा पार गोंधळलाय. हा नक्की जनता दरबार होता की कार्यकर्ता दरबार? की निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेला एक नवा ‘राजकीय स्टंट दरबार’? नेते लोकांच्या समस्या ऐकतायत की कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी चार्ज करतायत? की दोन्ही एकत्र शिजवलेली ‘राजकीय खिचडी’ आहे?
खरं काहीही असो, एक मात्र नक्की! निवडणुकीचा हंगाम आला की नेत्यांना जनतेची आठवण येते, जनता दरबार भरतात, आश्वासनांची खैरात होते आणि मग… पुढचं तुम्हाला चांगलंच माहीत आहे! तोपर्यंत आपण काय करायचं? मस्तपैकी या राजकीय मनोरंजनाचा आनंद घ्यायचा! बघूया, या दरबारातून जनतेच्या समस्या सुटतात की फक्त नेत्यांच्या व्होट बँकेची गणितं सुटतात! चला, पॉपकॉर्न तयार ठेवा मंडळी!