नगरपालिका निवडणुकीचे निकाल काय लागले, जणू ‘फेसबुक पिंट्या’ उर्फ पावशेरसिंह यांच्या अंगात दहा हत्तींचे बळच संचारले! धाराशिव, तुळजापूर आणि नळदुर्गच्या गडावर पिंट्यांची ‘प्यादी’ अशी काही फिट बसली की, पिंट्यांची छाती गर्वाने ३६ वरून थेट ७२ इंच झाली. पण खरा ‘धुमाकूळ’ घातला तो पिंट्यांचे लाडके सुपुत्र गब्बरसिंह उर्फ मल्लू नेरुळकर यांनी!
मल्लूने विजयाचा गुलाल अंगाला लावण्याऐवजी तो डोक्यातच घातला. त्यांनी थेट सूर्यराजेंच्या निवडणूक चिन्हाची वासलात लावायला सुरुवात केली. “तो काय तुमचा निवडणूक चिन्ह? तो तर ‘आईस्क्रीमचा कोन’ आहे! निवडणुकीच्या उन्हात तो पार वितळून गेलाय,” अशी टर उडवत मल्लूने थेट आव्हान दिले— “आता झेडपी निवडणुकीत जर हा आईस्क्रीमचा कोन पुन्हा दिसला, तर मी माझं नाव बदलेन!”
तुळजापुरात तर कहरच झाला. ड्रग्ज प्रकरणातील डाग लागलेला उमेदवार चक्क निवडून आला. सूर्यराजेंनी सर्व शक्ती पणाला लावली होती, पण पिंट्यांच्या ‘माफिया’ तंत्रापुढे सर्व निष्फळ ठरले. या विजयाने गब्बरसिंह उर्फ मल्लू नेरुळकर इतके हर्षोल्हासीत झाले की, पदग्रहण समारंभात त्यांनी गर्जना केली, “आमच्या पुढील ५० पिढ्या राजकारण करतील!” सूर्यराजेंचा एकेरी उल्लेख करत, “त्यांनी दिल्लीत काय दिवे लावले?” असा सवाल करत मल्लूने ‘झेडपी”वर आपलाच अध्यक्ष म्हणजे मातोश्रीला बसवण्याचा चंग बांधला.
पण ‘५० पिढ्या’ या शब्दाने जनतेच्या तळपायाची आग मस्तकात गेली. “इतका माज? आम्ही काय फक्त यांच्या पिढ्यांचे गुलाम म्हणून जन्माला आलोय का?” असा सवाल धाराशिवच्या चौकाचौकात विचारला जाऊ लागला.
‘विमान’ जमिनीवर आणि ‘रेल्वे’ कागदावर!
मल्लूच्या ‘अतिशहाणपणा’मुळे उडालेला जनतेचा भडका पाहून फेसबुक पिंट्या सावध झाले. मुलाने उडवलेली धूळ शांत करण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा आपल्या भात्यातून ‘विकासाचे पिल्लू’ बाहेर काढले. डॅमेज कंट्रोलसाठी पिंट्यांनी फेसबुकवर तांत्रिक शब्दांची अशी काही फेकफेक केली की, लोकांना वाटलं आपण धाराशिवमध्ये आहोत की नासामध्ये?
पिंट्यांनी जाहीर केले:
“धाराशिव विमानतळाचा कायापालट! धावपट्टी १,२१८ मीटरवरून आता थेट ३,५०० मीटर होणार! रुंदी ३० वरून ४५ मीटर! बोईंग ७३७, ७७७ आणि एअरबस ३२०, ३२१ सारखी अजस्त्र विमाने आता थेट धाराशिवच्या मातीत उतरणार! उडान योजनेअंतर्गत आपल्या पाठपुराव्याला यश आले आहे!”
हे वाचून जनता चक्रावून गेली. ज्या जिल्ह्याच्या रस्त्यांवरील खड्ड्यांतून एसटी बस नीट जात नाही, तिथे पिंट्या चक्क ‘बोईंग ७७७’ उतरवायला निघाले होते! “विमानतळावर विमानं उतरणार की पिंट्यांचे गप्पांचे इमले?” अशा कमेंट्सचा पाऊस पडू लागला.
त्यातच भर म्हणून पिंट्यांनी आपल्या हक्काच्या ‘दिव्य पेपर’ मधून दुसरी मोठी घोषणा केली— “धाराशिव-तुळजापूर रेल्वेमार्ग पुढील वर्षी सुरू होणार!” गेली अनेक वर्षे ‘पुढील वर्षी’ येणारी ही रेल्वे अजून रुळावर आली नव्हती, पण कागदावर मात्र ती सुसाट धावत होती.
बोरूबहाद्दरचा ‘रिॲलिटी चेक’
या बाप-लेकांच्या ‘खेळा’वर बोरूबहाद्दरने आपल्या खास शैलीत मर्मावर बोट ठेवले. त्याने आपल्या सदरात लिहिले:
“धाराशिवची ‘डबल इंजिन’ रणनीती: मुलगा शिव्या देणार, बाप विमान उडवणार!”
बोरूबहाद्दरने खालील मुद्दे मांडले:
-
मल्लूचे गणित: ज्याला ‘आईस्क्रीम कोन’ वितळल्याचे वाटते, त्याने हे विसरावे की आईस्क्रीम कितीही वितळलं तरी त्याची ‘गोडी’ संपत नसते. ५० पिढ्यांच्या वल्गना करण्यापेक्षा या पिढीच्या प्रश्नावर बोला.
-
पिंट्यांचे ‘हवाई’ किल्ले: धावपट्टी ३,५०० मीटर होणार हे ठीक आहे, पण तिथे उतरणारी माणसं कुठे आहेत? आणि ज्या रेल्वेची घोषणा झाली, ती रेल्वे आहे की ‘मृगजळ’?
-
लोकांचा कौल: पिंट्यांच्या पोस्टखाली लोकांनी “फेक न्यूज” आणि “निवडणुका आल्या की विमानं उडतात” अशा कमेंट्सचा जो प्रसाद दिला आहे, तोच खरा आरसा आहे.
“मुलाने सूर्यराजेंवर गलिच्छ टीका करायची आणि बापाने विकासाच्या गप्पा मारून लोकांचे लक्ष भरकटवायचे, हा पिंट्यांचा जुनाच ‘टॅक्ट’ आहे. पण जनता आता ‘बोईंग’मध्ये बसून नव्हे, तर जमिनीवर चालून विचार करत आहे!”
…आणि मग काय झाले? पाहूया पुढच्या भागात.
- बोरूबहाद्दर






