धाराशिव: राज्यात महायुतीचं सरकार आलं आणि धाराशिव जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची लॉटरी लागली ती थेट मुंबईचे रहिवासी, शिवसेना (शिंदे गट) नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना! आता मुंबईकर मंत्री म्हटल्यावर धाराशिवला येणं म्हणजे कसं, वर्षातून दोनदा, फार तर तीनदा ! तेही खास मुहूर्तावर!
सरनाईक साहेब मुंबईहून थेट विशेष विमानाने (!) धाराशिवला ‘लँड’ होतात, पण फक्त २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) आणि १ मे (महाराष्ट्र दिन) अशा ‘फ्लॅग होस्टिंग’च्या कार्यक्रमापुरते! जणू काही जिल्ह्याचे व्हीआयपी पाहुणेच! साहेब आले की मग बैठकांचा नुसता धुरळा उडतो! उद्घाटनं, जिल्हा नियोजन समितीच्या बैठका… सगळं काही एका दिवसात आटपून साहेब पुन्हा मुंबईला रवाना! याला म्हणतात ‘वन डे पॉलिटीक्स’!
आता गंमत अशी की, सरनाईक साहेबांच्या अध्यक्षतेखाली आजवर दोन महत्त्वाच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठका झाल्या, पण दोन्ही बैठकांना जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि सध्याचे परंडा मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दांडी मारली! सावंत साहेब मागच्या सरकारमध्ये तब्बल अडीच वर्षं आरोग्यमंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री होते. पण या निवडणुकीत कसाबसा आमदारकीचा किल्ला लढवला आणि मंत्रिपद गेलं. तेव्हापासून साहेब कमालीचे नाराज असल्याची चर्चा आहे. गेली कित्येक महिने ते आपल्या मतदारसंघात फिरकले नाहीत आणि आता पालकमंत्र्यांच्या बैठकांनाही येईनासे झालेत.
आता या गैरहजेरीमागचं कारण काय? तर सूत्रांच्या माहितीनुसार, सावंत साहेबांना वाटतंय, “अहो, कालपर्यंत मीच या बैठकांचा अध्यक्ष होतो, आता आमदार म्हणून दुसऱ्या पालकमंत्र्यांच्या हाताखाली बैठकीला कसं बसायचं?” म्हणजे हा सगळा मानापमानाचा आणि खुर्चीचा खेळ सुरू आहे तर!
आता धाराशिवकरांनी काय करावं? एक पालकमंत्री वर्षातून दोनदा विमानाने फक्त झेंडावंदनासाठी येतात, तर दुसरे स्थानिक आमदार आणि माजी पालकमंत्री मतदारसंघाकडे आणि महत्त्वाच्या बैठकांकडे पाठ फिरवून बसलेत! या राजकीय ‘लुकाछुपी’त जिल्ह्याच्या विकासाचं काय होणार, हाच खरा प्रश्न आहे! याला आता म्हणावं तरी काय? तुम्हीच सांगा!