धाराशिव: शहरात सध्या रस्त्यांपेक्षा खड्डेच जास्त आहेत, आणि या खड्ड्यांतून मार्ग काढताना सामान्य नागरिक जेरीस आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक (शिवसेना, शिंदे गट) यांनी रस्त्यांच्या कामांसाठी मंजूर झालेले १४० कोटी रुपयांचे टेंडर रद्द केल्याने शहरातील रस्त्यांची अवस्था ‘ना घर का, ना घाट का’ अशी झाली आहे. त्यातच तोंडावर आलेल्या नगरपालिका निवडणुकांमुळे या खड्ड्यांच्या विषयावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि काँग्रेसने एकत्र येत आर. पी. कॉलेजसमोर ‘रास्ता रोको’ आंदोलन करत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. “राजमाता जिजाऊ चौक ते शिवाजी महाराज चौक आणि राजमाता जिजाऊ चौक ते पिवळी टाकी या रस्त्यांची कामे तात्काळ सुरू करा,” अशी त्यांची प्रमुख मागणी होती.या आंदोलनानंतर मात्र शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध पेटले आहे.
“वाह्ह्ह रे नौटंकी!” – शिंदे गटाचा घणाघात
“ही निव्वळ नौटंकी आहे,” अशा शब्दांत शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी ठाकरे गटाच्या आंदोलनाची खिल्ली उडवली. साळुंके यांनी जुन्या प्रकरणांना उजाळा देत म्हटले की, “भुयारी गटार योजनेच्या नावाखाली ज्यांनी शहराचा खेळखंडोबा केला, तेच आज रस्त्यांसाठी आंदोलन करत आहेत. ज्यांनी योजनेचे गोडाऊन स्वतःच्या शेतात उभे करून महिन्याला १० लाखांचे भाडे लाटले, त्यांनी जनतेला मूर्ख समजू नये.”
ते पुढे म्हणाले, “जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १४० कोटींचा निधी मंजूर केला, तेव्हा गप्प बसलेले खासदार, आमदार आणि नगराध्यक्ष आता निवडणुका जवळ आल्याने आंदोलनाचा फार्स करत आहेत. लोकांचे हाल करून त्यावर सहानुभूती मिळवण्याचा हा अत्यंत घृणास्पद प्रकार आहे. धाराशिवची जनता सुज्ञ आहे, ती सगळं पाहते आणि वेळ आल्यावर उत्तरही देईल.”
“आम्ही जनतेसाठी रस्त्यावर, तुम्ही मात्र धुणी धुवा” – ठाकरे गटाचा पलटवार
शिंदे गटाच्या टीकेला उत्तर देताना युवासेना जिल्हाप्रमुख रवी वाघमारे यांनी जोरदार पलटवार केला. “आम्ही जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरलो आहोत, पण तुम्हाला जनतेचं काय पडलंय? तुम्हाला फक्त भाजपच्या आमदारांची (राणा पाटील) धुणी धुवायची आहेत,” असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.
वाघमारे यांनी प्रश्नांची सरबत्ती करत म्हटले, “१४० कोटींची कामे का रखडली, याचं खरं कारण तुमच्या भाजपच्या आमदारांना विचारा. कामाचा कार्यारंभ आदेश मिळून नऊ-दहा महिने झाले, तरी काम का सुरू झाले नाही? तुमच्याच पालकमंत्र्यांनी मंजूर केलेल्या कामांना स्थगिती कोणी आणली? तेव्हा तुमच्या तोंडून आमदारांविरोधात एक शब्दही का निघाला नाही? त्यामुळे ज्यांना गुत्तेदारांना धमकावल्याचे आणि मारहाण केल्याचे किस्से शहरवासियांना माहीत आहेत, त्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये.”
राजकीय गदारोळात नागरिक मात्र खड्ड्यात
एकंदरीत, दोन्ही शिवसेना गटांच्या या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत मूळ मुद्दा बाजूलाच पडला आहे. सत्ताधारी निधी मंजूर झाल्याचे सांगत आहेत, तर विरोधक काम का सुरू होत नाही, असा जाब विचारत आहेत. या राजकीय कलगीतुऱ्यात धाराशिवचे रस्ते मात्र ‘जैसे थे’ आहेत आणि सामान्य नागरिक रोजचा प्रवास जीव मुठीत धरून करत आहे. निवडणुकांच्या तोंडावर सुरू झालेली ही राजकीय लढाई शहराला नवीन रस्ते देणार की केवळ आश्वासनांचे नवे खड्डे खोदणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.