धाराशिव – जिल्हा नियोजन समितीच्या सर्वसाधारण योजनेतून मंजूर झालेली कामं पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतःच स्थगित केल्याने मोठा राजकीय भूकंप झालाय. कारण अगदी स्पष्ट आहे – जिल्ह्याचे सत्ताधारी आमदार नाराज झालेत!
सूत्रांच्या माहितीनुसार, पालकमंत्री सरनाईक यांनी काही निधी विरोधी आमदारांच्या मतदारसंघात वाटला, ज्यामुळे सत्ताधारी एका आमदाराचा पारा चढला. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दाखल केली. ही तक्रारही कुठे केली गेली, तर तुळजापूर भेटीत – खास राजकीय संकेतांसह!
या आमदाराची नाराजी इतकी होती की त्यांना केवळ १५ टक्के नाही, तर तब्बल ४० टक्के कामांवर वर्चस्व हवं आहे. त्यामुळेच त्यांनी दबाव टाकत निर्णयात हस्तक्षेप घडवून आणला आणि अखेर सरनाईक यांना नाईलाजाने आपल्याच निर्णयावर स्थगिती आणावी लागली.
या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन विभागाने २ एप्रिल रोजी आदेश काढून, कार्यारंभ आदेश असलेली कामं वगळता सर्व कामं तात्पुरती स्थगित केली आहेत. जिल्हाधिकारी यांनीही हे आदेश अंमलात आणले आहेत.
सत्ता-राजकारणाच्या खेळीने जिल्ह्यातील विकासकामांवर टाच
हा निर्णय म्हणजे केवळ योजना स्थगित करणं नव्हे, तर जिल्ह्यातील विकासकामांवर राजकीय कुरघोडीचा स्पष्ट परिणाम आहे. अधिकारासाठी सुरू असलेल्या या चढाओढीत सामान्य जनतेचे हित कुठे तरी गमावले जात असल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे.
धाराशिव जिल्हा वार्षिक योजनेतील सर्वसाधारण कामांना तात्पुरती स्थगिती