धाराशिव : धाराशिव जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी (RDC) श्रीमती शोभादेवी जाधव यांची प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती परभणी येथे उप जिल्हाधिकारी (रोहयो) या पदावर करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने शुक्रवार, दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी हा बदलीचा आदेश जारी केला.
महाराष्ट्र शासनाचे उप सचिव महेश वरूडकर यांच्या स्वाक्षरीने हा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. शासन आदेश क्र. टिआरएफ-०९२५/प्र.क्र. २४१/१/आस्था-२ नुसार, महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन अधिनियम, २००५ च्या तरतुदींनुसार ही पदस्थापना देण्यात आली आहे. सार्वजनिक सेवेच्या हितासाठी आणि प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने ही बदली केल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
या आदेशान्वये, श्रीमती शोभादेवी जाधव यांना ७ नोव्हेंबर २०२५पासून त्यांच्या सध्याच्या पदावरून कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यांना नवीन नियुक्तीच्या जागी हजर झाल्याबाबतचा रुजू अहवाल शासनाच्या https://maharevenuehr.in या पोर्टलवर अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.





