धाराशिव: धाराशिव शहरात राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी नागरिकांनी गुरुवारी (दि. १२) डी-मार्टसमोर रास्तारोको आंदोलन केले.
या आंदोलनात शालेय विद्यार्थ्यांसह पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दोन दिवसांपूर्वीच महामार्गावर झालेल्या अपघातात एका शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली होती. आंदोलकांनी एनएचएआय व आयआरबीच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत सर्विस रोड आणि अंडरपासची निर्मिती तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली.
आंदोलकांनी “कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत रास्तारोको सुरूच ठेवणार,” अशी आक्रमक भूमिका घेतली. तर काहींनी रस्ता उखडून टाकण्याचा इशाराही दिला. आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागून एक तासाहून अधिक काळ वाहतूक ठप्प झाली होती.
एनएचएआयच्या वतीने २५ डिसेंबरपर्यंत सर्विस रोडचे डांबरीकरण पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
आंदोलकांच्या प्रमुख मागण्या:
- धाराशिव शहरातील डी-मार्ट ते आयुर्वेद कॉलेजपर्यंत राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला सर्विस रोडचे काम तातडीने पूर्ण करावे.
- पोदार शाळेजवळ विकास नगर येथे व जुना उपळा रोड येथे महामार्गाच्या दोन्ही बाजूने लहान चारचाकी वाहने जातील असे दोन अंडरपास तातडीने बांधावेत.
- अपघातांना जबाबदार असलेल्या एनएचएआय व आयआरबी कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.
आंदोलनातील ठळक बाबी:
- “जमिनी विकून आयआरबीला पैसे देऊ, काम पूर्ण करा,” अशी प्रतिक्रिया एका पालकाने आंदोलनस्थळी व्यक्त केली.
- महिलांनी आंदोलनादरम्यान आक्रोश करत आपली नाराजी व्यक्त केली.
- “१५ दिवसांत काम पूर्ण न झाल्यास संपूर्ण महामार्ग अडवून ठेवू,” असा इशारा आंदोलकांनी दिला.
या आंदोलनामुळे धाराशिव शहरातील अपघातांच्या समस्येकडे आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आहे. आता एनएचएआय दिलेले आश्वासन किती गांभीर्याने पूर्ण करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.