धाराशिव: सध्याच्या काळात जिथे ५-५० रुपयांसाठी माणसाची नियत बदलते, तिथे धाराशिवमध्ये माणुसकी जिवंत असल्याचे एक जबरदस्त उदाहरण समोर आले आहे. कुणीतरी घाईगडबडीत एटीएममधून पैसे काढले, पण ते मशीनमधून बाहेर घ्यायचेच विसरले… तब्बल १० हजार रुपये तिथेच पडून होते! पण सुदैवाने तिथे पोहोचले ते निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी प्रदीप मोकाशे आणि पुढचा अनर्थ टळला.
नेमकं काय घडलं?
घटना आहे आज (मंगळवार) दुपारची. धाराशिव शहरातील बार्शी नाक्यावरील ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’चे (SBI) एटीएम. दुपारी ४ च्या सुमारास एक अज्ञात ग्राहक पैसे काढण्यासाठी आला, व्यवहार केला, पण काय गडबड झाली कुणास ठाऊक, १० हजार रुपये मशीनच्या ट्रेमध्ये तसेच सोडून तो निघून गेला.
काही वेळातच निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी प्रदीप मोकाशे तिथे आले.पाठोपाठ माजी सैनिक ऍड दयानंद चंदनशिवे आले, त्यांची नजर त्या बेवारस रकमेवर पडली. आजूबाजूला पाहिले तर कुणीच नाही. मनात असते तर ते पैसे खिशात घालून ते निघून जाऊ शकले असते, पण त्यांची ‘माणुसकी’ जागा होती.


एका फोनने फिरली सूत्रे
मोकाशे यांनी क्षणाचाही विलंब न करता ‘धाराशिव लाईव्ह’चे संपादक सुनील ढेपे यांना फोन लावून हकीकत सांगितली. पत्रकार ढेपे यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्याशी संपर्क साधला. पोलिसांची तत्परताही वाखाणण्याजोगी होती! इज्जपवार यांनी लगेच दोन पोलीस कॉन्स्टेबल घटनास्थळी रवाना केले.
पोलिसांच्या ताब्यात रक्कम, आता शोध सुरू
पोलिसांनी ती १० हजारांची रक्कम सुरक्षितपणे ताब्यात घेतली आहे. आता बँकेच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्या विसरभोळ्या ग्राहकाचा शोध पोलीस घेत आहेत. लवकरच त्याचे पैसे त्याला मिळतील.
धाराशिवमध्ये कौतुकाचा वर्षाव
प्रदीप मोकाशे, ऍड दयानंद चंदनशिवे यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी दाखवून दिले की, अजूनही प्रामाणिकपणा शिल्लक आहे. रक्कम छोटी असेल, पण मोकाशे यांनी दाखवलेले ‘मन’ मात्र खूप मोठे आहे!





