धाराशिव: महसूल विभागांतर्गत धाराशिव जिल्ह्यातील मे २०२५ मध्ये झालेल्या कर्मचारी बदली प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप एका तक्रारीद्वारे करण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून एकाच मुख्यालयी कार्यरत असलेल्या पात्र कर्मचाऱ्यांना डावलून त्यांना बदलीतून सूट देण्यात आल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. तुळजापूरचे शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते अमोल शिवाजीराव जाधव यांनी ही तक्रार महसूल व वन विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे.
तक्रारीनुसार, काही कर्मचारी लिपिक वर्गीय पदावरून पदोन्नती मिळाल्यानंतरही त्याच मुख्यालयात कार्यरत आहेत. वास्तविक पाहता, शासन नियमांनुसार कोणताही कर्मचारी एका मुख्यालयी जास्तीत जास्त ६ वर्षे कार्यरत राहू शकतो. असे असतानाही, काही कर्मचारी नियुक्तीपासून सुमारे १० वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून एकाच कार्यालयात व त्याच मुख्यालयी महसूल सहाय्यक किंवा सहाय्यक महसूल अधिकारी अशा विविध पदांवर कार्यरत आहेत.
सदर कर्मचारी त्याच मुख्यालयात विविध पदांवर दीर्घकाळ कार्यरत असल्याने त्यांची अन्यत्र बदली होणे आवश्यक होते, परंतु त्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या नाहीत. संबंधित कर्मचाऱ्यांची पदोन्नती झाल्यामुळे त्यांचा ओव्हरस्टे (अतिरिक्त कार्यकाळ) गृहीत धरण्यात आला नसल्याचे दिसून येत असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. जरी कर्मचाऱ्याची पदोन्नती झाली असली तरी, त्यांचा ओव्हरस्टे गृहीत धरून त्यांची अन्यत्र बदली करणे अपेक्षित आहे, असा दावा तक्रारदाराने केला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथील संबंधित आस्थापना विषयक काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यांनी बदली संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना चुकीची माहिती दिली आणि त्यांच्या जवळच्या ओव्हरस्टेमधील कर्मचाऱ्यांना बदली प्रक्रियेतून वगळण्याची चुकीची कार्यवाही केली असल्याचा गंभीर आरोपही या तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी तातडीने चौकशी करून, मागील १० वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून एकाच मुख्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची तात्काळ अन्यत्र बदली करावी, अशी मागणी तक्रारदार अमोल जाधव यांनी केली आहे. तसेच, या चुकीच्या बदली प्रक्रियेस जबाबदार असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. ही तक्रार २८ मे २०२५ रोजी दाखल करण्यात आली आहे.