मंडळी, अहो मंडळी! इकडे लक्ष द्या! धाराशिवच्या विकासाचा गाडा जो वर्षभरापासून ‘अंडर कन्स्ट्रक्शन’ मोडमध्ये अडकला होता, तो आता सुसाट निघणार अशी चिन्हं दिसत आहेत. तब्बल १४० कोटी रुपयांच्या ५९ चकचकीत डीपी रस्त्यांचा मार्ग मोकळा झालाय, आणि सगळ्यात भारी म्हणजे जनतेचे, होय होय, तुमचे-आमचे २२ कोटी रुपये पण वाचलेत! टाळ्या! (असं कोणीतरी म्हणालेलं ऐकण्यात आलंय.)
तर झालं असं की, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाचे शहरप्रमुख सोमनाथ (आप्पा ) गुरव यांनी नुकतीच ही ‘ब्रेकिंग न्यूज’ दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, महाविकास आघाडीच्या सततच्या पाठपुराव्याला आणि पालकमंत्र्यांच्या यशस्वी मध्यस्थीला ‘फर्स्ट क्लास’ यश आलंय. कंत्राटदार म्हणे, “साहेब, तुम्ही म्हणाल त्या दरात काम करतो, पण वाद नको!” अंदाजपत्रकीय दरानेच काम करायला तयार झालाय पठ्ठ्या! गुरव (आप्पा) आणि त्यांच्या साथीदारांनी (रवी वाघमारे, सरफराज काझी) २८ मे २०२४ ला आमरण उपोषणाचा जो ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ केला, त्याचा हा गोड शेवट असल्याचं ते सांगतायत. पालकमंत्र्यांनी शब्द दिला आणि पाळला, त्यामुळे आता फक्त ‘वर्क ऑर्डर’चीच काय ती देर आहे. गुरव (आप्पा ) म्हणतात, “पावसाळा काय, सिमेंट रस्त्याला फरक पडत नाही, तुम्ही फक्त कामाला सुरुवात करा!” म्हणजे बघा, किती ती तळमळ!
पण थांबा, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त! इथंच तर खरी ‘ट्विस्ट की एंट्री’ झालीये. माजी नगराध्यक्ष अमित भैय्या शिंदे हे पण ‘माईक’ घेऊन मैदानात उतरलेत. ते म्हणतात, “थांबा जरा! ही कुठली ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’गिरी? अहो, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच नियम केला होता की अंदाजपत्रकीय दरापेक्षा जास्त दराने कामं मंजूर करायची नाहीत. हा निर्णय अख्ख्या राज्यासाठी होता, फक्त धाराशिवसाठी नाही!” असा ‘गुगली’ टाकत शिंदे यांनी उबाठा गटावर ‘खोट्या श्रेयाचा स्टंट’ केल्याचा घणाघाती आरोप केलाय. “आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्यात पटाईत आहात राव तुम्ही!” असा टोलाही लगावलाय.
शिंदे भाऊ इथेच थांबले नाहीत, त्यांनी प्रश्नांची सरबत्तीच केली. “अहो, ती भुयारी गटार योजना कोणी थोपली शहराच्या माथ्यावर? तेव्हा कोणाचं उखळ पांढरं झालं? आणि बायोमायनिंगच्या वेळी १७% जास्तीच्या दराने निविदा गेली, तेव्हा का तोंड शिवून बसला होतात? तेव्हा नाही आठवलं आंदोलन करायला?” असे सवाल करत त्यांनी उबाठा गटाला चांगलंच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. त्यांच्या मते, आमदार राणाजगजितसिंह पाटलांनी निधी आणला आणि हे फक्त आंदोलनाचा ‘इव्हेंट’ करून श्रेय लाटायच्या मागे आहेत.
आता या आरोपांच्या ‘बाऊन्सर’ला सामोरे जायला शिवसेना (उबाठा) नेते पंकज पाटील यांनी जोरदार ‘पलटवार’ केलाय. त्यांनी थेट अमित शिंदेंनाच विचारलं, “अमित भाऊ, आधी तुमचा राजकीय ‘मालक’ निश्चित करा. तुम्ही सध्या दादांसोबत आहात की ताईंच्या गटात? ते स्पष्ट करा, मग सामाजिक मुद्द्यांवर बोला!” काय हे, थेट ‘नो बॉल’वर ‘फ्री हिट’ मारल्यासारखं! पाटील पुढे म्हणतात, “श्रेय आमचं नाहीच, जनतेच्या लढ्याचं आहे, हे आम्ही आधीच सांगितलंय. मग तुम्हाला मिरची झोंबायचं कारण काय?”
बायोमायनिंग आणि भुयारी गटारीच्या मुद्द्यावरही पाटील यांनी शिंदेंना ‘गुगली’ टाकली. “बायोमायनिंगच्या बाजूने सभागृहात सर्वाधिक नगरसेवक राणा पाटलांचेच होते, तेव्हा तुम्ही (अमित शिंदे) सभागृहात नव्हता, पण आमच्या ताई (सौ. वंदनाताई शिंदे) होत्या, त्यांना विचारा. आणि भुयारी गटार योजना तर तुमचे सध्याचे नेते राणा पाटलांनीच मागितली होती!” असा दावा करत त्यांनी शिंदेंनाच ‘कटघऱ्यात’ उभं केलंय.
तर मंडळी, धाराशिवच्या रस्त्यांवरून हा असा श्रेयवादाचा ‘तू तू मैं मैं’चा सामना जोरदार रंगलाय. एकीकडे वाचलेले २२ कोटी आणि दुसरीकडे आरोप-प्रत्यारोपांची कोटीच्या कोटी उड्डाणं! रस्ते कधी होणार, याकडे डोळे लावून बसलेल्या जनतेला मात्र या राजकीय ‘कलगीतुऱ्यातून’ सध्या तरी मनोरंजनाचा भरपूर ‘डोस’ मिळतोय, हे नक्की! आता पुढे काय होतंय, कोणता नवा ‘ट्विस्ट’ येतोय, हे पाहण्यासाठी धाराशिवकर ‘वेटिंग मोड’मध्ये आहेत! तोपर्यंत, हसत रहा आणि खड्डे चुकवत रहा!
- बोरूबहाद्दर