अहो, मी… मीच तो १४० कोटींचा रस्ता बोलतोय!
काय सांगू राव! कालपर्यंत मला वाटत होतं की मी फक्त ‘स्थगित’ झालोय. पण आज सकाळी कळलं, अरेच्चा! मी तर ‘हॉटस्पॉट’ झालोय. धाराशिवचा सगळ्यात फेमस ‘आंदोलन-पॉईंट’!
सकाळ झाली… पाहतो तर काय, काही माता-भगिनी माझ्यासाठी (म्हणजे माझ्या खड्ड्यांसाठी) रस्त्यावर उतरल्या. “स्थगिती उठवा!”, “विकास होऊ द्या!”… जोरदार घोषणा! माझं खड्ड्यांनी भरलेलं ऊर अभिमानाने फुलून आलं. चला, कुणीतरी माझी व्यथा समजून घेतंय.
पण…
मी जरा निरखून पाहिलं. या आंदोलनाला पाठींबा कुणाचा? तर… भारतीय जनता पार्टीचा!
थांबा, थांबा… मला चक्कर आली. अहो, ही तीच पार्टी ना, ज्यांच्या आमदारांनी चार दिवसांपूर्वी ‘मीच काम आणलं’, ‘मीच ६० कोटी वाचवले’ म्हणून स्वतःचे सत्कार घेतले? माझे भले मोठे होर्डिंग लावले?
म्हणजे बघा, ‘काम सुरू केलं’ म्हणून स्वतःचा सत्कार करायचा… आणि (महायुतीच्याच) सरकारने ‘काम थांबवलं’ म्हणून स्वतःच आंदोलन पण करायचं! यालाच ‘राजकीय कूटनीती’ म्हणतात वाटतं!


आणि यात अजून एक ट्विस्ट! या आंदोलनात भावी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार (भाजपच्या) आणि त्यांच्यासोबत राष्ट्रवादी (अजित पवार गट) च्या पण भावी उमेदवार! व्वा! म्हणजे ‘स्थगिती’च्या विरोधात भाजप-राष्ट्रवादी (अजित गट) एकत्र! (माझ्या खड्ड्यातल्या डोक्याला काही कळेनासं झालंय… हे आंदोलन होतं की पुढच्या नगरपालिकेच्या युतीची बोलणी?)
हा गोंधळ संपतो न संपतो, तोच दुसऱ्या बाजूने आवाज आला… “महाविकास आघाडीचा विजय असो!”, “भाजपा सरकारचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय!”…
धडाधड! ‘रास्ता रोको’!
आता हे दुसरे आंदोलक. महाविकास आघाडीचे.
त्यांचा मुद्दा तर अजूनच भारी. ते म्हणाले, “हे सगळं नाटक आहे! हा रस्ता (म्हणजे मी) आमदार राणा पाटील (भाजप) आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक (महायुती) यांच्या अंतर्गत भांडणात अडकलाय. हे दोघेच जबाबदार आहेत!”
त्यांनी तर ‘ते जास्तीचे २२ कोटी आम्हीच आमच्या उपोषणाने वाचवले’ याची पण आठवण करून दिली. (म्हणजे ‘मी-पहिला-आंदोलन-केलं’ वाला पॉईंट!)


तर मंडळी, आता फायनल परिस्थिती बघा:
मी (खड्ड्यांनी भरलेला) बिचारा मध्ये पडून आहे.
माझ्या उजव्या बाजूला, भाजप माझ्यासाठी आंदोलन करतंय (त्यांच्याच महायुतीच्या निर्णयाविरुद्ध).
माझ्या डाव्या बाजूला, मविआ माझ्यासाठी आंदोलन करतंय (या दोघांच्या भांडणामुळे).
सगळेच माझ्यासाठी लढतायत! सगळ्यांनाच माझी काळजी आहे! पण मला कुणीच बांधत नाहीये!
मला वाटायला लागलंय, माझं नाव ‘१४० कोटींचा रस्ता’ बदलून ‘धाराशिवचा अधिकृत आंदोलन चौक’ असं ठेवावं. तोपर्यंत… सांभाळून या… खड्डे आहेत!
- आपलाच (सर्वांचा लाडका आंदोलन-पॉईंट)
- १४० कोटींचा रस्ता.
 
			 
                                






