धाराशिव: शहरातील १४० कोटी रुपयांच्या रस्ते कामांच्या निविदा प्रक्रियेवरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकासच्या कामांमध्ये जादा दराने निविदा मंजूर न करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला असताना, उबाठा गट (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खोटे श्रेय घेण्यासाठी आंदोलनाचा स्टंट करत असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष अमित शिंदे यांनी केला आहे. “बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना” अशा शब्दात त्यांनी या श्रेय नाट्याची संभावना केली.
अमित शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, फडणवीस सरकारचा निर्णय राज्यव्यापी असताना, केवळ धाराशिवसाठी हा निर्णय झाल्याचा खोटा प्रचार करून उबाठा गट जनतेची दिशाभूल करत आहे. शहराला खड्ड्यात घालणारे स्वतःचे अपयश झाकण्यासाठी आंदोलनाला यश आल्याचा कांगावा करत स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
शिंदे यांनी उबाठा गटावर अनेक प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, “नागरिकांची मागणी नसताना भुयारी गटार योजना शहराच्या माथ्यावर थोपली गेली. त्यातून कोणाचे उखळ पांढरे झाले हे सर्वांनाच माहीत आहे. भुयारी गटारीच्या कामामुळे शहरातील सगळे रस्ते खड्ड्यात गेले. मात्र त्याच्या दुरुस्तीसाठी सत्तेत असताना निधी आणावा अशी यांना जरादेखील गरज वाटली नाही. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी धाराशिव शहरातील रस्त्यांच्या कामासाठी निधी आणला, असे असताना स्वतःचा अपयशी कार्यकाळ झाकण्यासाठी हे आंदोलनाचा स्टंट करत आहेत.”
“आंदोलनामुळे शहरवासीयांच्या खिशातले २२ कोटी रुपये वाचले असल्याचा खोटा बनाव करणारे, घनकचऱ्याच्या बायोमायनिंग कामाच्या वेळी तोंड शिवून का गप्प बसले होते? बायोमायनिंगची निविदा १७% जास्तीच्या दराने काढली तेव्हा का आंदोलन केले नाही? १७ टक्क्यांनी जास्तीची निविदा भरल्यानंतर कोणाच्या घशात तो पैसा गेला? गरज नसताना आणि शहरवासीयांची मागणी नसताना भूमिगत गटार योजना राबविण्यात कोणाचे हित होते? टक्केवारीसाठी अजिबात गरजेची नसलेली योजना राबवताना रस्ते खड्ड्यात कोणी घातले? त्यावेळी सत्तेत असणारे आमदार आणि खासदार यांनी शहरातील रस्त्यांसाठी का निधी आणला नाही? त्यावेळी सरकार तुमचेच होते, तुमचे मुख्यमंत्री होते, आमदार, खासदारही तुमचेच होते मग रस्त्यासाठी निधी आणावा अशी गरज तुम्हाला का वाटली नाही? केवळ कांगावा करण्यापेक्षा याचे उत्तरही जनतेला द्या,” असे आव्हान शिंदे यांनी दिले आहे.
डीपी रस्त्याच्या कामांना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यामुळे मंजुरी मिळाली असून, आमच्या प्रामाणिक पाठपुराव्याला आलेल्या यशाचे श्रेय घेण्यासाठी उबाठा गट प्रचंड खोटारडे दावे करत सुटला आहे. “आयत्या पिठावर रेघोट्या” ओढण्यात हा गट पटाईत असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः अंदाजित दरापेक्षा अधिक दराच्या कामांना मान्यता न देण्याचे स्पष्ट आदेश दिले असून, ही राज्यभर लागू असलेली धोरणात्मक भूमिका आहे. त्यामुळे केवळ धाराशिवसाठी हा निर्णय झाला असल्याचा उबाठा गटाचा दावा खोटा असल्याचे अमित शिंदे यांनी म्हटले आहे. या सर्व आरोप-प्रत्यारोपांमुळे धाराशिवमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, यावर उबाठा गटाकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.