धाराशिव : खड्डे आणि धुळीच्या त्रासाला कंटाळलेल्या धाराशिवकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी वादग्रस्त ठरलेले १४० कोटी रुपयांचे टेंडर रद्द केल्यानंतर आता त्यासाठी फेरनिविदा काढण्यात आली असून, दिवाळीनंतर प्रत्यक्ष कामांना सुरुवात होईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिली. मात्र, याच काळात नगरपालिका निवडणुका अपेक्षित असल्याने आचारसंहितेच्या फेऱ्यात ही कामे अडकणार का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभानंतर पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री सरनाईक यांनी ही माहिती दिली. शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि त्यावरून झालेले ‘रास्ता रोको’ आंदोलन व राजकीय आरोप-प्रत्यारोप या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांची ही घोषणा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. प्रदीर्घ काळ रखडलेल्या या कामाला आता गती मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे.
आश्वासन मिळाले, पण चिंता कायम
पालकमंत्र्यांच्या घोषणेमुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी, त्याचवेळी एक मोठा संभ्रमही निर्माण झाला आहे. दिवाळीनंतर लगेचच धाराशिव नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याची दाट शक्यता आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच आदर्श आचारसंहिता लागू होईल. नियमांनुसार, आचारसंहिता काळात नवीन विकासकामांची सुरुवात करता येत नाही किंवा त्यासाठी नारळ फोडता येत नाही.
त्यामुळे, “दिवाळीनंतर काम सुरू होणार म्हणजे नक्की कधी? तोपर्यंत आचारसंहिता लागली तर कामांचे काय होणार? हे आश्वासनही केवळ निवडणुकीपुरतेच ठरणार का?” असे अनेक प्रश्न सामान्य धाराशिवकरांच्या मनात घर करू लागले आहेत. त्यामुळे प्रशासनाने निवडणुकीची आचारसंहिता आणि रस्त्याच्या कामाची सुरुवात यांचा ताळमेळ कसा साधायचा, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तूर्तास, नागरिकांना आश्वासने मिळाली असली तरी, रस्त्यांवर प्रत्यक्ष काम सुरू होण्याची त्यांना प्रतीक्षा आहे.