धाराशिव : “तुम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काय, थेट देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते रस्त्यांचे उद्घाटन करा, पण कृपा करून धाराशिवच्या नागरिकांना या खड्ड्यांच्या नरकयातनेतून एकदाचे मुक्त करा,” अशा खोचक शब्दांत सोमनाथ गुरव यांनी आमदार राणा पाटील यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. रस्त्याच्या कामात प्रशासकीय नव्हे, तर आर्थिक हितसंबंध आणि सत्ताधाऱ्यांमधील वर्चस्ववादाचा अडथळा होता, असा गंभीर आरोपही गुरव यांनी केला आहे.
आमदार राणा पाटील यांनी शुक्रवारी शहरातील रस्त्यांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रित करणार असल्याचे जाहीर करताच, महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पाटील यांचा दावा म्हणजे निव्वळ ‘शब्दच्छल’ असून, ही कामे जुनीच आहेत, असे गुरव यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, “या कामांना २३ फेब्रुवारी २०२४ रोजीच प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. मात्र, तब्बल १८ महिने सत्ताधाऱ्यांच्या हटवादीपणामुळे आणि अंतर्गत वादामुळे एकही निविदा उघडली गेली नाही.”
‘आंदोलनानंतरच जाग आली’
महाविकास आघाडीने जनतेच्या प्रश्नासाठी सातत्याने लढा दिल्याचे गुरव यांनी सांगितले. “आम्ही ६ जानेवारी रोजी ‘रास्ता रोको’ केला, तेव्हा कुठे प्रशासनाला जाग आली आणि २८ फेब्रुवारीपर्यंत काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन मिळाले. पण तरीही हालचाल न झाल्याने आम्ही २८ एप्रिलपासून आमरण उपोषण सुरू केले. आमच्या तिसऱ्या दिवशी पालकमंत्र्यांनी भेट देऊन काम मार्गी लावण्याचे वचन दिले,” असे सांगत गुरव यांनी संघर्षाची कहाणी मांडली. या आंदोलनामुळेच ठेकेदार अंदाजपत्रकीय दराने काम करण्यास तयार झाला आणि शहरवासियांचे तब्बल २२ कोटी रुपये वाचले, असा दावाही त्यांनी केला.
आधी पोस्टरबाजी, मग कामाला खीळ?
“ज्या कामांसाठी सत्ताधाऱ्यांनी निधी आणल्याचा गवगवा करत शहरात एकही कोपरा पोस्टरशिवाय सोडला नव्हता, त्याच कामांना प्रशासकीय मंजुरी मिळून १८ महिने का अडवून ठेवले? तुमच्या हटवादी स्वभावामुळे जनतेला त्रास का दिला?” असा थेट सवाल सोमनाथ गुरव यांनी विचारला आहे. प्रसिद्धीचा सोस असलेल्यांनी कामाच्या विलंबावर मौन का पाळले, यावरही त्यांनी बोट ठेवले.
‘विलंबाची चौकशी करा, नार्को टेस्ट करा’
गुरव यांनी सांगितले की, “हा प्रशासकीय अडथळा नव्हताच, हा तर आर्थिक हितसंबंध आणि पालकमंत्री व आमदार यांच्यातील वर्चस्वाच्या लढाईचा परिणाम होता. आता तुम्हीच उद्घाटनाचा विषय काढल्यामुळे काम सुरू होईल अशी अपेक्षा आहे.” या संपूर्ण प्रक्रियेला उशीर का झाला, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी अधिवेशनात केली होती. “आम्ही तर मुख्याधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली होती. ही चौकशी झाल्यास या सत्ताधाऱ्यांचा खरा चेहरा जनतेसमोर येईल,” असा दावा करत गुरव यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचे आव्हान दिले आहे.