धाराशिव: शहरातील स्वच्छता व्यवस्थापनाचा बोजवारा उडाल्याने आणि तीन आठवड्यांपासून वेतन न मिळाल्याने आजपासून धाराशिवमधील सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
स्वच्छतेचे टेंडर – ठेकेदार बदलले, पण समस्या कायम!
एक वर्षापूर्वी बारामतीच्या एका ठेकेदाराला शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र, तोदेखील काम करत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी वारंवार केल्या. तरीही नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारावर कोणतीही कारवाई केलेली नाही.
काय आहेत मुख्य समस्या?
✅ शहरात नाले तुंबले, स्वच्छता होत नाही
✅ घंटा गाड्या वेळेवर येत नाहीत, अनेक भागांत कचऱ्याचे साम्राज्य
✅ कचराकुंड्यांचे व्यवस्थापन ढिसाळ, दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्या
✅ स्वच्छता कामगारांना तीन आठवड्यांपासून वेतन नाही
कामगारांचा ठाम निर्णय – ‘निवेदनही नाही, प्रतिक्रिया ही नाही!’
स्वच्छता कर्मचाऱ्यांनी स्पष्ट सांगितले की, आम्ही कोणालाही निवेदन देणार नाही, प्रसारमाध्यमांशी बोलणार नाही. कारण यापूर्वी एका ठेकेदाराने तक्रार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते.
“आम्ही फक्त बेमुदत काम बंद आंदोलन करून ठेकेदाराचा निषेध करणार!” अशी प्रतिक्रिया काही कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.
वेतन थकलं, पण ठेकेदाराला बिल वेळेवर मिळतं!
स्वच्छतेसाठी दर महिन्याला अंदाजे ₹72.50 लाख खर्च केला जातो, अशी प्राथमिक माहिती आहे. मात्र, नगरपालिका अधिकाऱ्यांच्या मते, ठेकेदाराकडून दर महिन्याला ₹50 ते ₹55 लाखांचे बिल सादर केले जाते.
❌ काम न करता ठेकेदाराकडून मोठी रक्कम उचलली जाते, पण कर्मचाऱ्यांना वेतन दिले जात नाही.
❌ नगरपालिकेने अद्याप स्वच्छता कर्मचाऱ्यांचे बिल पास केलेले नाही, त्यामुळे ठेकेदाराने तीन आठवड्यांपासून वेतन रोखून ठेवले आहे.
❌ नगरपालिकेतील अधिकारी आणि ठेकेदार यांच्यातील संगनमतामुळे शहराची स्वच्छता कोलमडली आहे.
‘काम न करता बिल, पण शहर कचऱ्यात!’- नागरिकांचा संताप
शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत, घंटागाड्या बंद पडल्या आहेत, नाले तुंबले आहेत. तरीही ठेकेदार मात्र महिन्याला लाखोंची बिले उचलत आहे.
➡ “नगरपालिका ठेकेदाराचे बिल तत्काळ काढेल, पण शहर मात्र अस्वच्छच राहील!” असे नागरिकांचे म्हणणे आहे.
➡ “ही संपूर्ण टेंडर प्रक्रिया म्हणजे आर्थिक गैरव्यवहार आहे!” अशीही जोरदार टीका केली जात आहे.
स्वच्छता व्यवस्था कोलमडली, पुढे काय?
सध्या संपूर्ण शहरातील स्वच्छता व्यवस्था ठप्प झाली असून, नगरपरिषद प्रशासन मात्र गप्प आहे.
➡ कर्मचाऱ्यांना वेतन देऊन कामावर आणले जाईल की ठेकेदारावर कारवाई होईल?
➡ नागरिकांचा संताप वाढत असताना प्रशासन यावर काय भूमिका घेणार?
याकडे संपूर्ण धाराशिवकरांचे लक्ष लागले आहे!