धाराशिव – मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाला पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांप्रमाणे योग्य भाव मिळावा तसेच दुध दरवाढ, सोयाबीन व इतर शेतीमालाला हमीभावासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना सतत पाठपुरावा करीत असताना राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. म्हणून यावर्षीची दिवाळी मुख्यमंत्र्यांच्या दारात आंदोलन करून साजरी करणार असल्याचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी (दि.27) देण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, खरीप हंगामात सोयाबीन पेरणी, खते, मशागत आणि काढणीचा खर्च लक्षात घेता त्या तुलनेत सोयाबीनला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अपुऱ्या पावसामुळे रब्बी हंगामही धोक्यात आला असून पशुधन जगविण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून यावर्षीची दिवाळी मुख्यमंत्र्यांच्या दारात साजरी करण्याचा शेतकऱ्यांनी निर्णय घेतला आहे.
तसेच मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाला पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांप्रमाणे योग्य भाव मिळावा. दुधाला प्रतिलिटर 45 रूपये वाढ मिळावी. शासनाकडून मंजूर झालेले अनुदान व पीकविमा तात्काळ शंभर टक्के शेतकर्यांच्या खात्यावर जमा करावा. शेतकर्यांच्या मुलीला लग्नासाठी प्रत्येकी 10 लाख रूपये मदत द्यावी, डीपी व दुरूस्तीसाठी वीज मंडळाला शेतकर्यांना खर्च करावा लागत आहे. तो खर्च शासनाकडून करण्यात यावा, कृषी विभागांतर्गत पोक्रा योजना धाराशिव जिल्ह्यासाठी चालू करण्यात यावी, शेतकर्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करून शेतीमालाला हमीभाव तसेच शेतकर्यांना मोफत वीज द्यावी, शेतकर्यांना देण्यात येणारे पीककर्ज अनुदान तात्काळ मंजूर करून पीककर्जासाठी अडवणूक करणार्या बँक अधिकारी व कर्मचार्यांवर कायदेशीर कारवाई करावी, पशुधन जगविण्यासाठी जनावरांना छावणीला नको तर दावणीला चारा उपलब्ध करून घ्यावा. सदरील मागण्या तात्काळ मान्य कराव्यात, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. आणि होणाऱ्या परिणामास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असेही निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भीमाशंकर इंगळे, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तानाजी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पेंदे, विजय सिरसट, उत्तरेश्वर आवाड, राहुल गायकवाड, सुधाकर चोपदार आदींची स्वाक्षरी आहे.