धाराशिवच्या गल्ल्या सध्या शिवसेना शिंदे गटाच्या नव्या “क्रांतिकारी” वादाने गाजत आहेत. निमित्त आहे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरांचे! पण बॅनर लावताना गटात फूट पडली, आणि शहरात “बॅनरबाजी चॅम्पियनशिप” सुरू झाली!
एका गटाने बॅनरवरून तानाजी सावंत यांना हटवले, तर सावंत समर्थकांनी दुसरे बॅनर उभे करून “आम्हीही काही कमी नाही” असे ठणकावून सांगितले. बॅनरवरचे फोटो हे राजकीय गट ओळखण्याचे नवे माध्यम झाले असून, “फोटो नाही, तर सपोर्ट नाही,” असा संदेश गटातल्या लोकांनी दिल्याचा सूर नागरिकांमध्ये आहे.
गटातले नेते बॅनरचे क्रिएटिव्ह डिझाईन आणि छायाचित्र निवडण्यावर भर देत असताना, काहींनी “बॅनर हे आमच्या गटाच्या प्रेमाचे प्रतीक आहे” असे ठामपणे सांगितले. मात्र, हा “प्रेमाचा” बॅनर प्रकरण एका गटासाठी पोटदुखी ठरल्याचे स्पष्ट आहे.
या गोंधळामुळे नागरिकांची करमणूक चांगलीच होते आहे. “पालकमंत्र्यांच्या स्वागतासाठी बॅनरपेक्षा रस्त्यांवरील खड्डे बुजवले असते, तर बरे झाले असते,” अशी मिश्कील टिपणी काही धाराशिवकरांनी केली आहे.
आता प्रश्न असा आहे की, या गटबाजीच्या नाट्याचा पुढील अंक काय असेल? एक बॅनर दुसऱ्याच्या बॅनरला मागे टाकेल की, शेवटी सर्व गट मिळून “बॅनरबाजी एकता मंच” उभा करतील? वेळच उत्तर देईल. तोपर्यंत, “धाराशिव बॅनर प्रिमियर लीग” एन्जॉय करा!