धाराशिव: धाराशिव शहरातील १४० कोटींच्या रस्ते कामावरून पेटलेला ‘रस्ता’-गदारोळ आता महायुतीत ‘महा-स्फोटा’च्या वळणावर आला आहे. “पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना ‘शुक्राचार्य’ म्हणत ट्रोल करणे” भाजपला चांगलेच भोवलेले दिसत आहे.
शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख सूरज साळुंखे आणि सुधीर पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजप आमदार राणा पाटील यांच्याविरुद्ध अक्षरशः ‘रणशिंग’ फुंकले आहे. “येत्या नगर पालिका निवडणुकीत भाजपला वगळून,” म्हणजेच स्वबळावर लढण्याची घोषणाच शिंदे गटाने केली आहे, ज्यामुळे धाराशिव महायुतीत उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘स्थगिती आम्हीच आणली!’
गेले काही दिवस ‘स्थगिती’वरून सुरू असलेल्या नाट्याचा ‘पर्दाफाश’ करताना शिंदे गटाने एक मोठा गौप्यस्फोट केला. जिल्हाप्रमुख सूरज साळुंखे आणि सुधीर पाटील यांनी स्पष्टच सांगितले की, “धाराशिव शहरातील १४० कोटींच्या रस्त्याच्या कामाला आम्हीच तक्रार केल्याने स्थगिती मिळाली आहे.”
थेट आरोप: ‘लाडक्या कंत्राटदारासाठी वेठीस धरले’
ही स्थगिती का आणली? याचे कारण देत शिंदे गटाने आमदार राणा पाटील यांच्यावर थेट आणि गंभीर आरोप केला. “भाजप आमदार राणा पाटील यांनी आपल्या ‘लाडक्या’ कंत्राटदाराला काम मिळावे, यासाठी संपूर्ण धाराशिव शहराला मागील १८ महिने वेठीस धरले,” असा घणाघात शिंदे गटाने केला आहे.
‘टिट-फॉर-टॅट’ राजकारण?
या संपूर्ण वादाची ठिणगी जिल्हा नियोजन समितीच्या (DPC) २६८ कोटींच्या कामावरून पडली होती. आमदार राणा पाटील यांनी या कामांना स्थगिती आणल्याने पालकमंत्री नाराज होते. जरी ही स्थगिती उठली असली, तरी ती केवळ २२ कोटींच्या कामांपुरतीच उठली असून, उर्वरित कामांचे ‘पुन्हा टेंडर’ काढले जाणार असल्याने पालकमंत्र्यांची नाराजी कायम होती.
त्याचाच ‘बदला’ म्हणून, आमदार पाटलांच्या मर्जीतील मानल्या जाणाऱ्या १४० कोटींच्या रस्ते कामाच्या ‘वर्क ऑर्डर’ला पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्थगिती दिली. यामुळे भाजप गोटात संताप उसळला आणि त्यांनी पालकमंत्र्यांना ‘शुक्राचार्य’ म्हणत ट्रोल करण्यास सुरुवात केली. याच ट्रोलिंगमुळे आता शिंदे गट आक्रमक झाला असून, त्यांनी थेट ‘महायुती’तूनच वेगळे लढण्याची भूमिका जाहीर केल्याने धाराशिवचे राजकारण ऐन थंडीत तापले आहे.
 
			 
                                






