धाराशिव: जिल्हाधिकारी कार्यालय परिसर आज एका अशा आंदोलनाने दणाणून गेला, जे पाहून उपस्थित नागरिकही चक्रावून गेले. नेहमीच्या घोषणा आणि निदर्शनांपलीकडे जात, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने ‘कलंकित मंत्री, हतबल मुख्यमंत्री’ अशी टॅगलाईन देत सरकारमधील मंत्र्यांच्या कथित कारभाराची प्रतीकात्मक चिरफाड केली.
आंदोलनाची सुरुवातच नाट्यमय होती. माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर निशाणा साधत कार्यकर्त्यांनी चक्क रमी पत्त्यांचा डाव मांडला आणि पत्ते हवेत भिरकावले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांऐवजी मंत्री पत्त्यांच्या डावात रमले आहेत, असा संदेश यातून देण्यात आला.
या अनोख्या आंदोलनाचा दुसरा अंक तर अधिकच रंगतदार ठरला. जादूटोण्याचे आरोप असलेले मंत्री भरत गोगावले यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेसमोर कार्यकर्त्यांनी अघोरी पूजा मांडली. मंत्रोच्चारांऐवजी सरकारच्या नावाने घोषणा देत, अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या मंत्र्यांचा निषेध करण्यात आला.
एवढ्यावरच हे आंदोलन थांबले नाही. ड्रग्ज माफियांशी संबंध असल्याचा आरोप असलेले महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी ‘ड्रग्ज’ लिहिलेल्या पुड्या फेकल्या. या प्रतिकात्मक कृतीतून सरकारमधील मंत्र्यांच्या गंभीर स्वरूपाच्या कथित संबंधांवर बोट ठेवण्यात आले.
आमदार कैलास पाटील आणि आमदार प्रवीण स्वामी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित पाटील, शहर प्रमुख सोमनाथ गुरव यांच्यासह असंख्य कार्यकर्ते हातात सरकारविरोधी फलक घेऊन सहभागी झाले होते. या हटके आंदोलनाने धाराशिवच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
Video