ढोकी : ‘लग्नाचे वय झाले असताना लग्न न करता गळ्यात गंडा घालून का फिरतोस,’ या कारणावरून झालेल्या वादात मुलाने वडिलांच्या डोक्यात खोऱ्याचा दांडा घालून त्यांची हत्या केल्याची घटना पळसप येथे घडली होती. याप्रकरणी आरोपी मुलगा वैभव लाकाळ (वय ३०) याला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घटनेत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ३१ जुलै रोजी झालेल्या या हल्ल्यानंतर वडील चंद्रकांत लाकाळ (वय ६५) यांचा जागीच मृत्यू झाला नव्हता. त्यांना गंभीर अवस्थेत लातूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर ७ ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
काय घडले होते?
पळसप येथील वैभव लाकाळ हा हरियाणातील रामपाल महाराज यांचा भक्त होता. त्याचे वडील चंद्रकांत यांना मुलाचे हे वागणे पसंत नव्हते. ३१ जुलै रोजी रात्री त्यांनी मुलगा वैभवला ‘लग्नाचे वय झाले, ते सोडून तू गळ्यात गंडा घालून का फिरतोस,’ असे म्हणत फटकारले. याच कारणावरून बाप-लेकात वाद पेटला. संतापाच्या भरात वैभवने वडिलांच्या डोक्यात खोऱ्याच्या दांडक्याने जबर मारहाण केली.
घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या चंद्रकांत यांना तातडीने लातूरला हलवण्यात आले, जिथे ७ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर दुसरा मुलगा प्रमोद लाकाळ यांनी ९ ऑगस्ट रोजी ढोकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी वैभव विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विलास किलास करत आहेत.
जिल्ह्यात मोठा भक्तसंप्रदाय
दरम्यान, रामपाल महाराज यांचा धाराशिव जिल्ह्यात मोठा भक्तसंप्रदाय आहे. त्यांचे अनुयायी व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन आणि समाजजागृतीचे काम करत असल्याचा दावा करतात. मात्र, याच गुरुच्या भक्तीवरून मुलाने बापाचा जीव घेतल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.