धाराशिव: दहावीचा निकाल जाहीर झाला आणि सगळीकडे आनंदाचे वातावरण पसरले. कुणी 35 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले, तर कुणी 100 टक्के गुण मिळवून यशाची पताका फडकवली. पण धाराशिव जिल्ह्यात मात्र एका वेगळ्याच निकालाची चर्चा सुरू आहे, जी ऐकून मन सुन्न होतं. ही कहाणी आहे मारुती इटाळकर नावाच्या तरुणाची, ज्याने दहावीच्या परीक्षेत 62 टक्के गुण मिळवले, पण हा निकाल पाहण्यासाठी तो या जगातच नव्हता.
ही दुर्दैवी घटना 11 तारखेला घडली. मारुती इटाळकर याच्या बहिणीची काही टवाळखोरांनी छेड काढली होती. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या मारुतीला अमानुष मारहाण करण्यात आली, ज्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर धाराशिव शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त कुटुंबीयांनी आणि नागरिकांनी आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी मारुतीचा मृतदेह थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात नेला होता. यानंतर पोलिसांनी दोषींवर गुन्हे दाखल केले.
एकीकडे हे सर्व सुरू असतानाच, दुसरीकडे मारुतीने दिलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल त्याच्या कुटुंबीयांच्या हाती आला. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत, प्रचंड कष्ट करून मारुतीने 62 टक्के गुण मिळवत यश संपादन केले होते. त्याने दहावीची परीक्षा तर पास केली, पण नियतीच्या क्रूर थट्टेमुळे तो आयुष्याच्या परीक्षेत मात्र नापास ठरला.
आता त्याच्या कुटुंबीयांसमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे – त्याने मोठ्या मेहनतीने मिळवलेले हे गुण आणि ही गुणपत्रिका आता कोणाला दाखवायची? त्याच्या यशाचा आनंद कोणासोबत साजरा करायचा? या प्रश्नांची उत्तरे कोणाकडेच नाहीत, आहेत फक्त डोळ्यांतील अश्रू आणि मनात सलणारी एक खोल जखम. मारुतीच्या जाण्याने केवळ एक तरुण जीवच संपला नाही, तर एका कुटुंबाचे स्वप्नही भंगले आहे. या घटनेने संपूर्ण धाराशिववर शोककळा पसरली आहे.