धाराशिव – धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अमर पाटील यांचे छायाचित्र (डीपी) वापरून आणि त्यांची ओळख भासवून एका अज्ञात व्यक्तीने कारखान्यातील अधिकारी बाबासाहेब कचरु वाडेकर यांना तब्बल १ कोटी १० लाख रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी धाराशिव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी बाबासाहेब कचरु वाडेकर (वय ५१, रा. ऑफिसर क्वार्टर्स, धाराशिव साखर कारखाना, चोराखळी, ता. कळंब) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १५ एप्रिल २०२५ रोजी सकाळी सुमारे पावणेसात वाजल्यापासून ते १७ एप्रिल २०२५ रोजी रात्री सव्वा एक वाजेच्या दरम्यान त्यांना एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरून (७२५९५८०३८) संपर्क साधण्यात आला. संपर्क साधणाऱ्या व्यक्तीने मोबाईलवर कारखान्याचे चेअरमन/सीएमडी अमर पाटील यांचा फोटो डीपी म्हणून ठेवला होता.
स्वतःची ओळख लपवून, आपण चेअरमन अमर पाटील असल्याचे भासवून या अज्ञात व्यक्तीने वाडेकर यांना बँक खाते क्रमांक २०१०००४३४६६४६४ वर १ कोटी १० लाख रुपये ऑनलाइन पाठवण्यास सांगितले. चेअरमनच बोलत असल्याचा विश्वास बसल्याने वाडेकर यांनी रक्कम पाठवली, मात्र त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
याप्रकरणी वाडेकर यांनी १७ एप्रिल २०२५ रोजी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान (सुधारित) अधिनियम २००८ चे कलम ६६(सी) (ओळख चोरी) व ६६(डी) (संगणक प्रणालीचा वापर करून प्रतिरूपणाद्वारे फसवणूक) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. सायबर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.