धाराशिव: पंधरा महिन्यांत आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून एका कंपनीने तब्बल ३५ जणांना एक कोटी सहा लाख सत्तावन्न हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार धाराशिव शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी ‘सुखमनी कंपनी’च्या चेअरमनसह चौघांविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सुखमनी कंपनी’चे चेअरमन राजेंद्र सोपान जाधव (रा. हातमोळी, ता. तासगाव, जि. सांगली), फाउंडर लिडर मयुर कुदळे, शितल कुदळे आणि महादेव कुदळे (सर्व रा. सारोळा, ता. जि. धाराशिव) यांनी संगनमत करून ही फसवणूक केली. आरोपींनी २५ मार्च २०२० रोजी धाराशिव शहरातील कोर्ट कॉलनी, सांजा रोड परिसरात नागरिकांना गुंतवणुकीसाठी आकर्षित केले.
याप्रकरणी सुरेखा महेश लोहार (वय ३९, रा. कोर्ट कॉलनी, सांजा रोड, धाराशिव) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींनी ५० हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर १५ महिन्यांत ७० हजार रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवले होते. त्यांच्या या आमिषाला बळी पडून फिर्यादी सुरेखा लोहार यांच्यासह इतर ३४ जणांनी एकूण १,०६,५७,००० रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, मुदत संपल्यानंतरही परतावा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आले.
अखेर, सुरेखा लोहार यांनी २ ऑगस्ट २०२५ रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी ‘सुखमनी कंपनी’च्या संबंधित चौघा आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१८(४), ३(५) तसेच महाराष्ट्र ठेवीदारांचे (हितसंबंधांचे रक्षण) अधिनियम कलम ३ आणि ४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून, गुंतवणूकदारांचे पैसे परत कसे मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.