धाराशिव: ज्यांच्या खांद्यावर उद्याची पिढी घडवण्याची जबाबदारी, तेच गुरुजी जर स्वतःच्या स्वार्थासाठी ‘आजारी’ पडू लागले, तर नवलच! धाराशिव जिल्ह्यातून एक असाच धक्कादायक प्रकार समोर आलाय, जिथे शिक्षकांनी सोयीच्या ठिकाणी बदली मिळावी म्हणून थेट दिव्यांगत्वाचे बोगस प्रमाणपत्र सादर केल्याचा पर्दाफाश झाला आहे.माध्यमांनी या ‘बदलीच्या आजाराचा’ पंचनामा केल्यानंतर आता प्रशासकीय चक्रं वेगाने फिरू लागली आहेत.
काय आहे हा ‘आजारी’ प्रकार?
शासकीय नोकरीत बदली हा अविभाज्य भाग असला तरी, काही शिक्षकांना मात्र ‘पाहिजे तिथे पोस्टिंग’चा मोह काही आवरवत नाही. मग काय, या शिक्षकांनी नामी शक्कल लढवली. ऑनलाइन बदली प्रक्रियेतील दुर्गम ठिकाणी जाण्याची अडचण टाळण्यासाठी काहींनी थेट कॅन्सर, हृदयरोगासारख्या गंभीर आजारांची खोटी प्रमाणपत्रं बनवली, तर काहींनी स्वतःला हात-पाय अधू असल्याचे भासवून दिव्यांग प्रमाणपत्र मिळवलं. धक्कादायक म्हणजे, तब्बल शंभर शिक्षकांनी अशी दिव्यांगत्वाची प्रमाणपत्रं सादर केल्याचा आरोप आहे. जणू काही बदलीसाठी ‘दिव्यांग’ होण्याची स्पर्धाच लागली होती!
प्रशासकीय ‘ऑपरेशन’ आणि धक्कादायक सत्य!
माध्यमांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाला जाग आली. चौकशी सुरू झाली आणि धक्कादायक माहिती समोर येऊ लागली. तब्बल ३९ शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या. इतकंच नव्हे तर, २१ शिक्षकांनी चक्क बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे आपल्या सोयीच्या ठिकाणी बदली करून घेतल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालं आहे. म्हणजे, जे शिक्षक विद्यार्थ्यांना नैतिकतेचे धडे देतात, तेच अशा गैरमार्गाचा अवलंब करत असतील, तर समाजाला दिशा कोण दाखवणार, हा मोठा प्रश्न आहे.
आता विभागीय चौकशीचा बडगा!
या ‘कलाकार’ शिक्षकांची आता चांगलीच गोची होणार आहे. धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांनी या २१ शिक्षकांच्या विरोधात थेट विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. आजपासूनच गटशिक्षण अधिकाऱ्यांमार्फत या शिक्षकांची प्रत्यक्ष चौकशी सुरू होणार असून, दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई अटळ आहे, अशी ग्वाही उपशिक्षणाधिकाऱ्यांनी दिली आहे.
ज्या शिक्षकांना समाज सर्वोच्च स्थानी मानतो, त्यांनीच असा ‘शॉर्टकट’ वापरून व्यवस्थेची फसवणूक करणं, हे शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारं आहे. आता या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन, बोगस प्रमाणपत्रं देणाऱ्या रॅकेटचाही पर्दाफाश करण्याची मागणी आहे.