धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात चोरांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या घटनांमध्ये दुचाकी, रोख रक्कम, दागिने आणि शेतीउपयोगी साहित्याची चोरी झाली आहे. धाराशिव शहर आणि मुरुम पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, एकूण ९६,००० रुपयांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल लंपास झाला आहे.
शहरातून दुचाकी लंपास
धाराशिव शहरातील साईराम नगर भागातून एका तरुणाची होंडा शाईन मोटारसायकल (क्र. एमएच १३ सीजी ८१५६) चोरीला गेल्याची घटना घडली आहे. आकाश श्याम बनसोडे (वय २८) यांनी १७ जुलै रोजी रात्री आपली अंदाजे १५,००० रुपये किमतीची दुचाकी घरासमोर उभी केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ती जागेवर आढळली नाही. याप्रकरणी बनसोडे यांनी २९ जुलै रोजी दिलेल्या तक्रारीवरून धाराशिव शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्रवासात वृद्ध महिलेचे दागिने आणि रोकड पळवली
दुसऱ्या घटनेत, लातूर जिल्ह्यातील एकंबी येथील रहिवासी असलेल्या एका वृद्ध महिलेला चोरट्यांनी लक्ष्य केले. आशाबाई सुरेश राठोड (वय ६०) या २८ जुलै रोजी सकाळी कावलदरा येथून धाराशिवकडे मॅक्झिमो गाडीतून प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान, गाडीतील तीन अनोळखी महिलांनी त्यांच्या पर्समधील ४,००० रुपये रोख आणि १५ ग्रॅम वजनाचे दागिने, असा एकूण ३४,००० रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी आशाबाई राठोड यांच्या तक्रारीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मुरुममध्ये शेतीसाहित्याची चोरी
तिसरी घटना मुरुम येथे घडली असून, चोरांनी थेट शेतकऱ्याच्या शेडवर डल्ला मारला. रामकृष्ण जितेंद्र अंबर (वय ३०) यांच्या मुरुम-आष्टाकासार रोडवरील शेतातील पत्र्याच्या शेडमधून अज्ञात व्यक्तीने कडबा कुट्टी मशीन, दूध काढणी यंत्र, ५ एचपीची पाणबुडी मोटर, फवारणी पंप आणि खताची सहा पोती असा एकूण ४७,६०० रुपयांचा माल चोरून नेला. याप्रकरणी रामकृष्ण अंबर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुरुम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या तिन्ही प्रकरणांमध्ये संबंधित पोलीस ठाण्यांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात वाढत्या चोऱ्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.