धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात शनिवारी (दि. ३० ऑगस्ट) चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला. एकाच दिवशी परंडा तालुक्यातील आसू गावात अनेक घरे फोडून ऐंशी हजारांपेक्षा जास्त रकमेचा माल चोरण्यात आला, तर दुसरीकडे उमरगा बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत एका महिलेच्या पर्समधून तब्बल १ लाख ४० हजार रुपयांचे दागिने आणि मोबाईल लांबवण्यात आला. या घटनांमुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
परंड्यातील आसू गावात एकाच रात्री अनेक घरफोड्या
परंडा तालुक्यातील आसू गावात शनिवारी पहाटे १ ते ३ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी अनेक घरे लक्ष्य केली. धनाजी रामचंद्र यादव (वय ५३) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला आणि घरातील १०,००० रुपयांची रोख रक्कम चोरली.
याचबरोबर चोरट्यांनी गावातील इतर घरेही फोडली. यामध्ये सोमनाथ जाधव यांच्या घरातून १०,००० रुपये रोख, कुसुम जाधव यांच्या घरातून सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम मिळून एकूण ५१,५०० रुपये, बळीराम बुरुंगे यांच्या घरातून ९,००० रुपये, तर हरिदास बुरुंगे यांच्या घरातून चांदीचे दागिने आणि ६,५०० रुपयांची रोकड चोरण्यात आली. इतकेच नाही, तर बजरंग जाधव यांच्या घरातून तीन साड्याही चोरट्यांनी लंपास केल्या. या सर्व घरफोड्यांमध्ये एकूण ८८,५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
उमरगा बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत लाखोंचे दागिने लंपास
दुसऱ्या घटनेत, उमरगा शहरातील बसस्थानकात एका महिलेला गर्दीचा फायदा घेत लुटण्यात आले. प्रणिता विलास जाधव (वय २७, रा. कदेर) या शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास उमरगा-लातूर बसमध्ये चढत होत्या. यावेळी अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या पर्समधील ४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि एक ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन चोरला. चोरीला गेलेल्या ऐवजाची एकूण किंमत १ लाख ४० हजार रुपये आहे. याप्रकरणी प्रणिता जाधव यांच्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकाच दिवशी जिल्ह्यात चोरी आणि घरफोडीच्या मोठ्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, पोलीस दोन्ही प्रकरणांचा अधिक तपास करत आहेत.