धाराशिव : धाराशिव जिल्हा आणि परिसरात चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, अज्ञात चोरट्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी, गोडाऊनमधील मालाची चोरी, तसेच वाहनचोरी करून लाखोंचा मुद्देमाल लंपास केला आहे. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
नळदुर्गमध्ये घरफोडी, पावणेचार लाखांचा ऐवज चोरीला
तुळजापूर तालुक्यातील हंगरगा नळ येथील दयानंद प्रकाश चौगुले (वय ४८) यांच्या राहत्या घरात अज्ञात चोरट्यांनी १ सप्टेंबरच्या मध्यरात्री ते २ सप्टेंबरच्या पहाटेदरम्यान प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेले १३५ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि १ लाख रुपयांची रोख रक्कम असा एकूण ३ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी दयानंद चौगुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी गोडाऊनमधून ७१ हजारांची सुपारी चोरीला
धाराशिव एमआयडीसी परिसरातील संजय देसमाने यांच्या गोडाऊनमधून कच्च्या सुपारीची ७९८ पोती चोरीला गेल्याची घटना घडली आहे. लातूर येथील रहिवासी विठ्ठल सठवाजी लोंढे (वय ५०) यांनी ही सुपारी गोडाऊनमध्ये ठेवली होती. २४ जूनच्या रात्री ते २५ जूनच्या पहाटेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी तब्बल ७१,००० रुपये किमतीची सुपारीची पोती चोरून नेली. याप्रकरणी विठ्ठल लोंढे यांच्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
शहरातून मोटारसायकल, तर ग्रामीण भागातून शेतीची मोटार लंपास
चोरीच्या इतर घटनांमध्ये, धाराशिव शहरातील चैत्राली क्लासेसच्या समोरून पृथ्वीराज विजय चव्हाण (वय २३) यांची ३०,००० रुपये किमतीची एचएफ डिलक्स कंपनीची मोटारसायकल (क्र. एमएच २५ एक्यु १२८१) अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. ही घटना ३१ ऑगस्ट रोजी रात्री घडली.
तर परंडा तालुक्यातील भोत्रा येथील शेतकरी प्रमारुती ज्ञानदेव शेळके (वय ६२) यांची सिना नदीजवळच्या शेतातून १०,००० रुपये किमतीची ७.५ एचपीची ॲक्वाटेक्स कंपनीची पाण्याची मोटार चोरट्यांनी लंपास केली.
या दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.