धाराशिव: जिल्ह्यात चोरांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, धाराशिव शहर आणि कळंब तालुक्यात घरफोडी, दुकानफोडी आणि लॅपटॉप चोरीच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. या घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांनी एकूण साडेतीन लाखांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास केला आहे. संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये अज्ञात आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
कळंबमध्ये किराणा दुकान फोडून अडीच लाखांचा माल लंपास
सर्वात मोठी चोरी कळंब शहरातील लक्ष्मीनगर भागात घडली. येथील रमेश चांगदेव बसाटे (वय ४८) यांच्या ओम साई किराणा दुकानाचे शटर अज्ञात चोरट्यांनी २१ ऑगस्टच्या रात्री साडेनऊ ते २२ ऑगस्टच्या पहाटे चारच्या दरम्यान तोडले. चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून विविध प्रकारची तेल, साबण, चहापत्ती, हळद, गूळ, साखर, तांदूळ, काजू, बदाम, अक्रोड यांसारख्या किराणा मालासह एकूण २ लाख ४९ हजार ६६८ रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. याप्रकरणी रमेश बसाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दिवसाढवळ्या घर फोडून ५० हजारांची रोकड चोरली
धाराशिव शहरातील राघुचीवाडी येथे दिवसाढवळ्या घरफोडीची घटना घडली. नेताजी अंकुश माळी (वय ४८) यांच्या घराचा कडी-कोंडा तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला. ही घटना २२ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ७ च्या दरम्यान घडली. चोरट्याने कपाटातील ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी नेताजी माळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंजिनिअरिंग कॉलेजमधून लॅपटॉपची चोरी
तिसरी घटना धाराशिव शहरातील तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये घडली. अबुसुफीयान एक्बाल काझी (वय २७, रा. ढोकी) यांचा ३५ हजार रुपये किमतीचा एसर कंपनीचा लॅपटॉप अज्ञात व्यक्तीने २१ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ च्या दरम्यान चोरून नेला. याप्रकरणी अबुसुफीयान काझी यांच्या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
एकाच दिवशी नोंद झालेल्या या विविध चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, चोरट्यांना लवकरात लवकर जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.