धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. परंडा येथे एका ज्वेलर्सच्या दुकानाचे शटर उचकटून, तर धाराशिव शहरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला. यासोबतच ग्रामीण भागात ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची चाके चोरून नेल्याचीही घटना घडली आहे. या घटनांमुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
परंड्यात ज्वेलर्सच्या दुकानात धाडसी चोरी
पहिली घटना परंडा तालुक्यातील रुई येथे घडली. येथील गणेश चंद्रकांत कवटे (वय २५) यांच्या “गणेश ज्वेलर्स” या दुकानाला चोरट्यांनी लक्ष्य केले. मंगळवार, १६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री २ ते २:३० च्या सुमारास सात अज्ञात व्यक्तींनी दुकानाच्या शटरचे सेंटर लॉक फरशीतून उचकटले आणि साईडची लॉक पट्टी कापून आत प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने सीसीटीव्हीचा डीव्हीआर असा एकूण ७४,५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी गणेश कवटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धाराशिव शहरात बंद घर फोडले
दुसरी घटना धाराशिव शहरातील समता नगर येथे घडली. दिलीप श्रीधरराव कावळे (वय ६६) हे कामानिमित्त घराबाहेर असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडले. १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६:१५ ते १६ सप्टेंबर रोजी दुपारी २:३० च्या दरम्यान ही घटना घडली. चोरट्यांनी घरात प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ६९,००० रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी दिलीप कावळे यांच्या तक्रारीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
गोवर्धनवाडीत ट्रॅक्टरची चाके चोरीला
तिसरी घटना ढोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोवर्धनवाडी येथे घडली. येथील शेतकरी अमोल अंकुश लोमटे (वय ३५) यांच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची तीन चाके अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. १५ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजण्यापूर्वी ही चोरी झाली. या चाकांची अंदाजे किंमत ४०,००० रुपये आहे. याप्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
या तिन्ही घटनांमध्ये पोलिसांनी संबंधित कलमांनुसार गुन्हे दाखल केले असून, आरोपींचा शोध सुरू केला आहे. एकाच वेळी शहरी आणि ग्रामीण भागात झालेल्या या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.






