धाराशिव: जिल्ह्यात चोरी आणि घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, उमरगा, वाशी आणि नळदुर्ग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनांमध्ये नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
उमरग्यात बंद घर फोडून दोन लाखांची चोरी
उमरगा तालुक्यातील कुन्हाळी येथील एका ७० वर्षीय वृद्धाच्या घरातून चोरट्यांनी तब्बल २ लाख ६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. फिर्यादी माधव सिद्धू ढोणे (वय ७०, रा. भिमनगर, कुन्हाळी) यांच्या तक्रारीवरून उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ढोणे यांच्या राहत्या घराच्या बंद खोलीचा कडी-कोंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. ही घटना ९ मार्च २०२५ च्या रात्री ११ ते १० मार्च २०२५ च्या पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान घडली. चोरट्यांनी घरातील ३९ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ८५,००० रुपयांची रोकड असा एकूण २,०६,००० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी १६ ऑगस्ट रोजी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(४) आणि ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हायवेवर टेम्पोतून दीड लाखांचा माल पळवला
वाशी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर थांबलेल्या एका टेम्पोमधून अज्ञात चोरट्यांनी सुमारे दीड लाख रुपयांचा माल चोरून नेल्याची घटना घडली आहे. सुरेश तमन्ना कोळी (वय ६०, रा. उत्तर सोलापूर) यांनी याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. १४ ऑगस्ट रोजी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास वाशी शिवारातील घुले माळ येथे त्यांच्या टेम्पोमधून चोरट्यांनी रेडबुल एनर्जी ड्रिंकचे ८४ बॉक्स, सनसिल्क आणि डव्ह कंपनीचे शाम्पूचे बॉक्स असा एकूण अंदाजे १,५२,००० रुपये किमतीचा माल चोरला. याप्रकरणी १६ ऑगस्ट रोजी वाशी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नळदुर्ग परिसरात शेतकऱ्याचा सौर पंप चोरला
नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काटगाव शिवारात एका शेतकऱ्याच्या विहिरीवरील सौर ऊर्जेवर चालणारी पाणबुडी मोटार चोरट्यांनी चोरून नेली आहे. पोपट खंडा माळी (वय ६५, रा. काटगाव, ता. तुळजापूर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. ४ ऑगस्टच्या रात्री १० ते ५ ऑगस्टच्या सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या गट क्रमांक ४७० व ४७१ मधील शेतातील विहिरीवरून अंदाजे १०,००० रुपये किमतीची ३ एचपीची सौर मोटार चोरीला गेली. या घटनेप्रकरणी १६ ऑगस्ट रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.