धाराशिव – जिल्ह्यात चोरांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून परंडा आणि तुळजापूर तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. घरासमोर लावलेल्या दोन मोटारसायकली आणि शेतात काढून ठेवलेले हजारो रुपयांचे सोयाबीन चोरट्यांनी लंपास केले आहे. या घटनांमध्ये एकूण १ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
परंड्यात घरासमोरून स्प्लेंडर गाडी चोरीला
पहिल्या घटनेत, गोरख दगडू ढगे (वय ५१, रा. चिंचपूर ढागे, ता. भूम, हल्ली मुक्काम अंदोरा, ता. परंडा) यांची ४०,००० रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर प्लस मोटरसायकल (क्र. एमएच २५ एवाय ६७५०) दि. ७ ऑक्टोबरच्या रात्री साडेनऊ ते दि. ८ ऑक्टोबरच्या सकाळी साडेदहाच्या दरम्यान अंदोरा येथील त्यांच्या राहत्या घरासमोरून अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. याप्रकरणी गोरख ढगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तुळजापुरात मोबाईल शॉपीसमोरून युनिकॉर्न लंपास
दुसऱ्या घटनेत, राजेंद्र काशिनाथ मगर (वय ५४, रा. वाघोली, ता. धाराशिव) यांची ५०,००० रुपये किमतीची होंडा युनिकॉर्न मोटरसायकल (क्र. एमएच २५ एए ४१५०) चोरीला गेली. दि. ६ ऑक्टोबरच्या रात्री नऊ ते दि. ७ ऑक्टोबरच्या पहाटे चारच्या दरम्यान लातूर रोडवरील विश्वनाथ कॉर्नर जवळील भवानी मोबाईल शॉपी समोरून अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
चिंचोली शिवारातून ७५ हजारांचे सोयाबीन चोरी
तिसऱ्या घटनेत चोरट्यांनी थेट शेतकऱ्याच्या शेतमालावर डल्ला मारला. बालवीर बळभीम पाटील (वय ७०, रा. चिंचोली, ता. तुळजापूर) यांच्या चिंचोली शिवारातील शेतात काढून ठेवलेले सोयाबीनचे ५० कट्टे, जे अंदाजे ५५ क्विंटल वजनाचे होते, ते अज्ञात व्यक्तीने चोरून नेले. या सोयाबीनची किंमत ७५,००० रुपये आहे. ही घटना दि. ८ ऑक्टोबरच्या रात्री अकरा ते दि. ९ ऑक्टोबरच्या पहाटे पाचच्या दरम्यान घडली. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
एकाच वेळी घडलेल्या या घटनांमुळे पोलीस यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.