धाराशिव: जिल्ह्यात चोरी आणि घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, भुम, तुळजापूर आणि येरमाळा पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या ठिकाणी चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये दुकानाचे पत्रे कापून रोकड लंपास करणे, गर्दीचा फायदा घेऊन महिलेचे दागिने चोरणे आणि झोपलेल्या प्रवाशाचा खिसा कापण्यासारख्या घटनांचा समावेश आहे.
भुम: दुकानाचे पत्रे कापून ८ हजारांची चोरी
भुम शहरातील नगरपालिकेच्या शेजारी असलेल्या अंबाबाई देवी मंदिराजवळील ज्ञानेश्वर किराणा दुकानात चोरीची घटना घडली आहे. अज्ञात चोराने ३० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान दुकानाच्या छताचे पत्रे कटरने कापून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील गल्ल्यात ठेवलेली ८,००० रुपयांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी दुकान मालक नवनाथ कल्याणराव हुरकुडे (वय ४२) यांनी ३ ऑक्टोबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून भुम पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ) आणि ३३१(४) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
तुळजापूर: बस स्थानकात झोपलेल्या प्रवाशाचा खिसा कापला
तुळजापूर येथील लातूर रोड नवीन बस स्थानकात झोपलेल्या प्रवाशाचा खिसा कापल्याची घटना घडली आहे. फिर्यादी हरीभाऊ रामराव काकडे (वय ५५, रा. जयपुर, जि. जालना) हे २ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास प्लॅटफॉर्मवर झोपले होते. यावेळी आरोपी रमेश दगडू भोसले (वय ४७, रा. छत्रपती संभाजीनगर) याने त्यांच्या पॅन्टच्या खिशातील ५०० रुपये चोरून नेले. हरीभाऊ काकडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून तुळजापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
येरमाळा: बसमध्ये चढताना वृद्धेचे ३५ हजारांचे गंठण लंपास
येरमाळा बस स्थानकात बार्शीला जाणाऱ्या बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरट्याने लंपास केले. सोजराबाई शिवाजी भिल्ल (रा. दत्तनगर, वाशी) असे पीडित महिलेचे नाव आहे. १ ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास ही घटना घडली. चोरट्याने त्यांच्या गळ्यातील १३ ग्रॅम वजनाचे, सुमारे ३५,००० रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण चोरून नेले. याप्रकरणी सोजराबाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येरमाळा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.