धाराशिव: जिल्ह्यातील वाशी आणि कळंब तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, वेगवेगळ्या घटनांमध्ये हायवेवर थांबलेल्या टेम्पोतून माल लंपास करणे आणि शेतातील शेडमधून बकऱ्या चोरून नेण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण दीड लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये अज्ञात आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना कळंब तालुक्यातील दहिफळ येथे घडली. येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहिफळ येथील शेतकरी बालाजी विश्वनाथ भातलवंडे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडचे कुलूप तोडून चोरट्यांनी ६ मोठ्या बकऱ्या चोरून नेल्या. २२ ते २३ ऑगस्टच्या रात्री हा प्रकार घडला. या बकऱ्यांची किंमत अंदाजे ६०,००० रुपये असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
चोरीच्या इतर दोन घटना वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर घडल्या. पहिल्या घटनेत, खुर्शीद अकबर शेख (रा. गेवराई, जि. बीड) यांचा मालवाहू टेम्पो पार्डी फाटा ते सरमकुंडी फाटा दरम्यान एका राजस्थानी धाब्याजवळ उभा होता. २२ ऑगस्टच्या सकाळी अज्ञात चोरट्यांनी टेम्पोतून सुमारे ५३,००० रुपये किमतीची रिवाइंडिंग वायर आणि इतर माल चोरून नेला.
दुसऱ्या घटनेत, जुबेर शब्बीर शेख (रा. वाळूज, जि. छ. संभाजीनगर) यांच्या टेम्पोतून पारगावजवळ हायवे एनएच ५२ वरून सेंन्सोडाइन टूथपेस्टचा बॉक्स चोरण्यात आला. या मालाची किंमत १२,६९६ रुपये आहे. ही घटना २१ ऑगस्ट रोजी घडली असून, दोन्ही प्रकरणांत वाशी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या या चोऱ्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस या तिन्ही प्रकरणांतील आरोपींचा शोध घेत आहेत.