धाराशिव – शहरातील वाहतूक पोलिसांनी आपल्या नेमून दिलेल्या जबाबदाऱ्यांपासून विचलित होऊन पान-चहाच्या गप्पांमध्ये स्वतःला मग्न केल्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था अक्षरशः कोलमडली आहे. वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनधारकांच्या चेहऱ्यावर असलेली चिडचिड, पोलिसांच्या पान टपऱ्यांवरील उपस्थितीने अधिकच वाढत आहे. “वाहतुकीचे नियोजन रस्त्यावर आहे की पान टपरीवर?” असा प्रश्न आता धाराशिवच्या नागरिकांना सतावत आहे.
रस्त्यांवर कोंडी, पान टपरीवर मोकळीक!
छत्रपती शिवाजी महाराज चौक, बस स्थानक, देशपांडे स्टँड, बार्शी नाका अशा गजबजलेल्या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी नेमलेले पोलीस त्यांच्या ठराविक जागी दिसतच नाहीत. नेमलेल्या सिग्नल पॉइंटवर थांबून वाहनांची शिस्त लावण्याऐवजी हे पोलीस पान टपऱ्या, चहा दुकाने किंवा रस्त्याच्या कडेला एखाद्या ओळखीच्या व्यक्तीशी गप्पा मारण्यात व्यस्त असतात. यामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे, आणि वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.
“हातात गुटखा, आणि दुसऱ्या हातात हस्तांदोलन!”
वाहनधारकांची तक्रार आहे की, वाहतूक पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करणे बंद केले आहे. उलट, काही ठिकाणी वाहतूक पोलिसांना नियम मोडणाऱ्या वाहनचालकांसोबत गुप्तगु आणि हस्तांदोलन करताना पाहण्यात आले आहे. हे हस्तांदोलन नेमके काय साधते, याबाबत मात्र नागरिक अचंबित आहेत. “वाहतूक कोंडीला उपाय म्हणून गुप्तगुचा वापर होत आहे का?” असा उपरोधिक प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे अपघातांचे प्रमाण वाढले!
वाहतूक पोलिसांच्या या बेफिकीर वागण्यामुळे शहरातील अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. चुकीच्या दिशेने, अतिवेगाने वाहने चालवणाऱ्या वाहनधारकांना कोणीच रोखत नसल्यामुळे रस्त्यांवरील शिस्त बिघडली आहे. याचा फटका इतर जबाबदार वाहनचालक आणि पादचारी नागरिकांना बसत आहे.
पोलीस अधीक्षकांचा वचक गेला कुठे?
शहरातील वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्यावर आहे. मात्र, त्यांच्या वचकाचा अभाव जाणवत असल्यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णतः ढासळल्याचे चित्र आहे. नागरिकांनी या परिस्थितीवर चिंता व्यक्त करत “पोलीस अधीक्षकांचा वचक गेला कुठे?” असा सवाल केला आहे. पोलिसांनी जर आपले काम योग्य पद्धतीने केले असते, तर आज वाहतुकीची अवस्था इतकी बिकट झाली नसती, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
वाहतुकीच्या समस्येवर नागरिकांचा विनोदी प्रतिकार!
या परिस्थितीला वाचा फोडण्यासाठी काही नागरिकांनी “मी माझ्या जबाबदारीवर वाहतूक सांभाळतो” असे स्टिकर आपल्या वाहनांवर लावण्यास सुरुवात केली आहे. काहींनी तर वाहतूक पोलिसांना पान टपऱ्यांवरच ‘वाहतूक नियंत्रण कक्ष’ सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. “पोलिसांनी चहाचे पैसे घेऊन गप्पा माराव्यात, आम्ही वाहतूक सांभाळतो,” असे उपरोधिक विधान नागरिक करत आहेत.
पान टपरीवरून पुन्हा सिग्नल पॉईंटवर कधी येणार?
धाराशिव शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आपली जबाबदारी गांभीर्याने घेतली पाहिजे, अशी अपेक्षा आहे. पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी या प्रकरणात लक्ष घालून नागरिकांच्या प्रश्नांची दखल घ्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. “पोलीस पान टपऱ्यांवरून उठून कधी परत रस्त्यांवर दिसतील?” हा प्रश्न आज धाराशिवच्या नागरिकांसाठी मोठा आहे.
जुने म्हण आहे, “पोलीस तुमचे मित्र असतात,” पण धाराशिवकरांच्या मते, आता ते “पानाच्या गिऱ्हाईकांमध्ये” परिवर्तित झाले आहेत!