धाराशिव: शहरात वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईवर एका नागरिकाने गंभीर आरोप केले आहेत. गाडीचा सायलेन्सर बेकायदेशीरपणे काढून घेणे, दंडाची पावती न देणे, आणि गाडीतील पेट्रोल चोरीला गेल्याचा संशय व्यक्त करत दिलीप कांबळे यांनी पोलीस अधीक्षक, धाराशिव यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. या तक्रारीची प्रत त्यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, परिवहन मंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्यासह मानवी हक्क आयोगालाही पाठवली आहे.
घटनेचा तपशील
तक्रारदार दिलीप कांबळे यांच्या म्हणण्यानुसार, दिनांक १६ जून २०२५ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांचा मुलगा मोटारसायकल (क्र. MH 25 AB 2471) वरून धाराशिव शहरातील सेंट्रल बिल्डिंगजवळून जात होता. यावेळी वाहतूक शाखेचे स.पो.नी. कदम आणि जमादार आनंत केंद्रे यांनी त्याला अडवून कागदपत्रांची मागणी केली. सर्व कागदपत्रे दाखवल्यानंतरही, गणवेशात नसलेल्या एका हवालदाराने गाडीची चावी हिसकावून घेतली आणि मुलाला गाडीवरून उतरवून ती गाडी जबरदस्तीने वाहतूक नियंत्रक कार्यालयात नेली.
श्री. कांबळे हे स्वतः घटनास्थळी दुसऱ्या वाहनातून उपस्थित होते आणि त्यांनी मुलासह वाहतूक कार्यालयात धाव घेतली. तिथे त्यांची मोटारसायकल साखळीने बांधलेली दिसली. त्यांनी अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत.
आरोप आणि तक्रारी
त्याच दिवशी दुपारी, वाहतूक जमादार आनंत केंद्रे यांनी कांबळे यांच्या मुलाकडून रोख १,००० रुपये घेतले आणि दुसरे सायलेन्सर बसवून गाडी घेऊन जाण्यास सांगितले. गाडीची पाहणी केली असता, मूळ सायलेन्सर गायब होते आणि टाकीतील पेट्रोलही संपलेले आढळले, ज्यामुळे पेट्रोल काढल्याचा संशय बळावला आहे.
श्री. कांबळे यांनी आरोप केला आहे की, सायलेन्सर काढण्यापूर्वी कोणत्याही तज्ञ व्यक्तीमार्फत किंवा डेसिबल मीटरने आवाजाची तपासणी करण्यात आली नाही. तसेच, सायलेन्सर जप्त केल्याची पावती किंवा जप्ती पंचनामा देण्याची विनंती केली असता, पोलिसांनी टाळाटाळ केली.
मागण्या
या संपूर्ण प्रक्रियेला बेकायदेशीर ठरवत, दिलीप कांबळे यांनी या प्रकरणाच्या न्यायालयीन प्रक्रियेसाठी सायलेन्सर जप्तीचा पंचनामा, मुद्देमाल पावती आणि स्टेशन डायरीची प्रत मिळण्याची मागणी केली आहे. तसेच, संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर जबरदस्तीने गाडी नेणे, बेकायदेशीरपणे सायलेन्सर काढणे आणि पेट्रोल गायब करणे याबद्दल कायदेशीर कारवाई करण्याची विनंती त्यांनी केली आहे.