धाराशिव: शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय आणि रुग्णालय परिसरातील बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. वृक्षतोडीतील गैरव्यवहार उघड झाल्यानंतर संबंधितांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे ‘धाराशिव लाइव्ह’च्या चौकशीत उघड झाले आहे.
झाडे तोडल्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी लाकडांना आग
धाराशिव लाइव्हने वृक्षतोडीविषयी तक्रार उचलून धरताच, परिसरातील झाडे तोडल्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी काही लोकांनी जाणीवपूर्वक लाकडांना आग लावली. याचा पुरावाही धाराशिव लाइव्हकडे असून, जळालेल्या लाकडांचे फोटो आणि व्हिडिओ प्राप्त झाले आहेत. या प्रकरणाने आता नव्याने वळण घेतले आहे.
गंगासागरे यांच्यावर अजूनही कोणतीही कारवाई नाही!
गेल्या काही दिवसांपासून हा गैरव्यवहार उघडकीस आला असतानाही डीन गंगासागरे यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. बेकायदेशीर वृक्षतोड, लाकडांचा अवैध व्यापार आणि आता पुरावे नष्ट करण्याचे प्रकार समोर येत असतानाही प्रशासन शांत का आहे? हा प्रश्न आता अधिक गंभीर झाला आहे.
प्रशासनाचा मौनवास; सरकारची भूमिकाही संदिग्ध
पर्यावरणाच्या मोठ्या ऱ्हासाबाबत प्रशासन आणि सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. वनविभाग, पोलिस प्रशासन आणि महाविद्यालय प्रशासन या संपूर्ण प्रकाराकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप होत आहे.
धाराशिव लाइव्हचा ठाम पवित्रा – सत्य बाहेर येईपर्यंत लढा सुरूच!
‘धाराशिव लाइव्ह’ने या प्रकरणातील प्रत्येक माहिती पुढे आणण्याचा निर्णय घेतला आहे. बेकायदेशीर वृक्षतोड, लाकडांचा गुप्त व्यापार आणि आता पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न – यामागे कोण? कोणत्याही दबावाला झुकणार नाही, जोपर्यंत जबाबदारांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत धाराशिव लाइव्हचा लढा सुरूच राहील!