धाराशिव – धाराशिव-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कावलदरा परिसरात आज (गुरुवार, दि. १० एप्रिल) पहाटेच्या सुमारास एक धक्कादायक दरोड्याची घटना घडली. तोंडाला मास्क लावलेल्या ५ ते ७ अज्ञात दरोडेखोरांनी रस्त्यावर दगड टाकून चार ते पाच चारचाकी वाहने अडवली, प्रवाशांना जबर मारहाण केली आणि त्यांच्याकडील लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास हे दरोडेखोर कावलदरा परिसरातील महामार्गालगतच्या झाडीत दबा धरून बसले होते. त्यांनी अचानक रस्त्यावर दगडफेक करून वाहने थांबवली. त्यानंतर कुटुंबासोबत प्रवास करत असलेल्या ४ ते ५ गाड्यांमधील प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली. दरोडेखोरांनी वाहनांचे टायर फोडून नुकसान केले आणि प्रवाशांकडील रोख रक्कम, सोन्याचे दागिने, लॅपटॉप, आयफोन असा लाखोंचा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून घेतला.
या घटनेनंतर सोलापूरहून धाराशिवकडे प्रवास करणाऱ्या कुरेशी नावाच्या एका चालकाने पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. मात्र, पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत सुमारे अर्धा ते एक तास उलटला होता आणि तोपर्यंत दरोडेखोर लूटमार करून पसार झाले होते.
या हल्ल्यात अनेक प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी दरोडेखोरांचा शोध सुरू केला आहे व पुढील तपास करत आहेत.