धाराशिव – तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गासाठी खाजगी वाटाघाटीने भूसंपादनाची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे बाबत महसूल सचिवांशी झालेल्या चर्चे प्रमाणे जिल्हाधिकारी यांना खाजगी वाटाघाटीने थेट खरेदीचा प्रस्ताव शासनाला सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. या रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरु असून धाराशिव जिल्ह्यातील 32 गावातील एक हजार 375 एकर जमीन या रेल्वे मार्गासाठी संपादित करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना खाजगी वाटाघाटीने खरेदीची संधी न देताच प्रशासनाकडून थेट रेल्वे अधिनियमा प्रमाणे करण्यात येत असलेले भूसंपादन योग्य नसून 12 मे 2015 च्या शासन निर्णया प्रमाणे शेतकऱ्यांना थेट खरेदीचा पर्याय उपलब्ध करून द्यावा व जेथे काही तांत्रिक अडचणी अथवा न्यायालयीन बाबी आहेत, तेथेच रेल्वे अधिनियमा प्रमाणे भूसंपादन करण्याबाबत आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी महसूल विभागाचे प्रधान सचिव श्री. वेणुगोपाल रेड्डी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. जिल्ह्यातील ही भूसंपादनाची प्रक्रिया बरीचशी पुढे गेल्याने रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला असहमती दर्शविली होती, मात्र प्रदीर्घ चर्चेअंती मार्ग काढण्याचे ठरले व याबाबत व्हिडिओ कॉन्फरनसिंग द्वारे काल बैठक घेण्यात आली. या बैठकीत जे शेतकरी खाजगी वाटाघाटीने खरेदीस तयार आहेत, त्यांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे जिल्हाधिकारी यांना आदेश देण्यात आले आहेत.
रेल्वे अधिनियमाप्रमाणे ग्रामीण भागातील जमिनीसाठी निर्धारित दराच्या 4 पट तर शहरी भागात 2 पट मावेजा दिला जातो, तर खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी केल्यास 25% अधिक म्हणजे ५ पट रक्कम मिळते. मात्र खाजगी वाटाघाटीने संपादन केल्यास शेतमालकांना पुन्हा न्यायालयात वाढीव मावेजसाठी मागणी करता येत नाही. तसेच खाजगी वाटाघाटीत देखील जिल्हाधिकारीच प्रचलित नियमाप्रमाणे दर निश्चिती करतात. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून शेतकऱ्यांनी स्वइच्छेने योग्य पर्याय ठरवावा असे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी शेतकऱ्यांना केले आहे.