नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रेल्वे मंत्रालयाच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेत भाग घेताना धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मराठवाड्याच्या प्रलंबित रेल्वे प्रश्नांवर जोरदार आवाज उठवला. ‘धाराशिव-तुळजापूर-सोलापूर’ या अत्यंत महत्त्वाच्या रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारने आपल्या वाट्याचे १ हजार कोटी रुपये तातडीने मंजूर करावेत, अशी आक्रमक मागणी त्यांनी लोकसभेत केली. यासोबतच लातूर-पुणे इंटरसिटी गाडी आणि धाराशिव-छत्रपती संभाजीनगर थेट रेल्वे मार्गाचा मुद्दाही त्यांनी लावून धरला.
मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम दळणवळण व्यवस्था आणि रेल्वेचे जाळे विस्तारणे किती गरजेचे आहे, हे खासदार राजेनिंबाळकर यांनी आकडेवारीसह संसदेत मांडले.
तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र रेल्वे नकाशावर आणा
तुळजापूरला रेल्वेने जोडण्याचे आश्वासन अनेक वर्षांपासून दिले जात आहे, मात्र ते अद्याप पूर्ण झालेले नाही. सध्या धाराशिव ते तुळजापूर या टप्प्याचे काम सुरू असले, तरी तुळजापूर ते सोलापूर हा महत्त्वाचा टप्पा अद्याप निविदा प्रक्रियेतच अडकलेला आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे २ हजार कोटी रुपयांची गरज आहे. त्यापैकी केंद्र सरकारने आपला १ हजार कोटी रुपयांचा हिस्सा तातडीने द्यावा. यामुळे महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या आई तुळजाभवानीचे पवित्र तीर्थक्षेत्र रेल्वेच्या नकाशावर येईल आणि लाखो भाविकांची सोय होईल, असे राजेनिंबाळकर म्हणाले.
धाराशिव-छत्रपती संभाजीनगर थेट जोडले जावे
छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्याचे प्रमुख विभागीय मुख्यालय आहे. येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि अजिंठा-वेरूळसारखी जागतिक वारसा स्थळे आहेत. त्यामुळे धाराशिव आणि परिसरातील नागरिक, विद्यार्थी व व्यापारी यांची तेथे सतत ये-जा असते. हे लक्षात घेऊन ‘धाराशिव-छत्रपती संभाजीनगर’ हा थेट रेल्वे मार्ग निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी केंद्राने ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल खासदारांनी समाधान व्यक्त केले व रेल्वे मंत्रालयाचे आभार मानले. मात्र, हे सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला गती द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
खासदारांच्या प्रमुख मागण्या एका दृष्टिक्षेपात:
-
लातूर-पुणे इंटरसिटी: लातूर, धाराशिव, बार्शी परिसरातील हजारो विद्यार्थी व नोकरदार दररोज पुण्याला जातात. प्रवाशांची गर्दी पाहता ‘लातूर-पुणे इंटरसिटी’ गाडी तातडीने सुरू करावी.
-
हरंगूळ गाडी मुख्य स्थानकापर्यंत: सध्या हरंगूळ ते पुणे ही गाडी हडपसरपर्यंतच धावते. प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी ही गाडी पूर्वीप्रमाणे पुणे मुख्य स्थानकापर्यंत चालवावी.
-
प्रस्तावित जलद गती मार्ग: पुणे ते सिकंदराबाद या प्रस्तावित जलद गती (हायस्पीड) रेल्वे मार्गाचा समावेश धाराशिव व लातूरमार्गे करण्यात यावा.
-
नवे थांबे: कळंब रोड स्थानकावर लातूर-मुंबई गाडीला, तर ढोकी स्थानकावर नांदेड-पनवेल गाडीला थांबा देण्यात यावा.






