धाराशिव: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठेवलेल्या स्टेटसवरून झालेल्या वादातून जातीयवादी टिप्पणी करून मारहाण व धमकी दिल्याचा आरोप करत एका १७ वर्षीय तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून दोन भावांविरुद्ध ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना धाराशिव जिल्ह्यातील भिकारसारोळा गावात १४ आणि १५ एप्रिल २०२५ रोजी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिकारसारोळा येथील रहिवासी प्रणव विठ्ठल मेदने (वय १७ वर्षे ७ महिने,) याने फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे, १४ एप्रिल रोजी त्याचा मित्र नारायण अंगद मुळे (रा. भिकारसारोळा ) याने प्रणवने इंस्टाग्रामवर ठेवलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या स्टेटसवर ईमोजी (प्रतिक्रिया ) दिली. त्याच दिवशी दुपारी सुमारे तीन वाजता प्रणव गावातील टाकीवर पाणी भरत असताना नारायण तेथे आला आणि जातीयवादी टिप्पणी करून निघून गेला.
दुसऱ्या दिवशी, १५ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास, प्रणव गावातील शिवाजी चौकात बसलेला असताना नारायण मुळे पुन्हा तेथे आला. त्याने जातीयवादी टिप्पणी केली. फिर्यादीनुसार, या बोलण्याचा राग आल्याने प्रणव आणि नारायण यांच्यात झटापट झाली. यावेळी नारायणने मारहाण करण्याचा प्रयत्न केला आणि झटापटीदरम्यान तो दगडावर व नंतर सिमेंटच्या कट्ट्यावर पडला, ज्यामुळे त्याच्या डोक्याला आणि हाताला दुखापत झाली.
याचवेळी नारायणचा भाऊ पंकज मुळे तेथे आला आणि त्याने जमावाला उद्देशून “याला धरा, याला लय माज आलाय” असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच, प्रणव घरी गेल्यानंतरही “बोलवा त्याला, लय माज आलाय त्याला” अशी धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.
प्रणव मेदने याने १७ एप्रिल रोजी रात्री ११ वाजून ११ मिनिटांनी ढोकी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी नारायण अंगद मुळे आणि पंकज मुळे यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ ची कलमे 115, 352, 351(2), 351(3), 3(5) आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ चे कलम 3(1)(r) व 3(1)(s) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.