धाराशिव – नगर पालिकेच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करून, अनधिकृत बांधकाम करून पत्र्याचे शेड्स उभे करणाऱ्या व्यापारी रामचंद्र बांगड यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, परंतु बांगड यांचे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी टोलवाटोलवी केली जात आहे. जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्या आदेशाला न.प. मुख्याधिकारी वसुधा फड यांनी केराची टोपली दाखवत बांगड यांचे अतिक्रमण काढण्यास असमर्थता दर्शवली आहे.
तुळजापूर रोडवरील जनता बँकेसमोर ( सर्व्हे नंबर २४० ) मध्ये व्यापारी रामचंद्र बांगड यांनी नगर पालिकेच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करून, अनधिकृत बांधकाम करून पत्र्याचे शेड्स उभे करण्यात आले आहेत. नगर पालिकेची जागा असताना, बांगड यांनी नगर पालिकेकडून बांधकाम परवाना न घेता, मोकळ्या जागेवर अतिक्रमण करून, अनधिकृत बांधकाम करून पत्र्याचे शेड्स उभे करत असताना त्यांना नोटीसा देऊनही त्यांनी बांधकाम न थांबवल्याने बांगड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश मुख्याधिकारी वसुधा फड यांनी, स्वच्छता विभागाचे लिपिक गोरख रणखांब यांना २३ ऑगस्ट रोजी दिला होता. पण केवळ कागदी घोडे नाचवण्यासाठी आदेश काढून पालिका मुख्याधिकारी वसुधा फड गप्प होत्या तर शहरात एकच अतिक्रमण आहे का ? असे म्हणून पोलीस निरीक्षक उस्मान शेख दुर्लक्ष करीत होते.
व्यापारी रामचंद्र बांगड यांच्याकडुन पालिका मुख्याधिकारी वसुधा फड आणि पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांना खुश करण्यात आल्याने गुन्हा दाखल होत नव्हता. धाराशिव लाइव्हच्या दणक्यानंतर व्यापारी रामचंद्र बांगड यांच्याविरुद्ध शहर पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगर रचना अधिनियम १९६६ च्या ५३ ( ७ ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, परंतु बांगड यांचे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी टोलवाटोलवी केली जात आहे.
याप्रकरणी माजी नगरसेवक उदय निंबाळकर यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली असता, जिल्हाधिकाऱ्यांनी सात दिवसाच्या आत हे अनधिकृत बांधकाम पाडण्याचा आदेश तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांनाचार महिन्यापूर्वी दिले होते. . या दोघांनी संयुक्त मोहीम आखून कारवाई करण्याचे निर्देश देखील दिले होते. त्यानंतर तहसीलदार शिवानंद बिडवे यांनी आपल्यावरील जबाबदारी नगर पालिका मुख्याधिकारी वसुधा फड यांच्यावर ढकलली आहे. त्यांनी जिल्हाधिकाऱ्याप्रमाणे १२ फेब्रुवारी २०२४ रोजी आदेश काढून , बांगड यांचे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले आहेत. आज आदेश निघून आठ दिवस झाले तरी, कोणतीही हालचाल दिसत नाहीत. जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्या आदेशाला न.प. मुख्याधिकारी वसुधा फड यांनी केराची टोपली दाखवत बांगड यांचे अतिक्रमण काढण्यास असमर्थता दर्शवली आहे.
नगर पालिका मुख्याधिकारी वसुधा फड यांच्या मते तहसीलदार शिवानंद बिडवे यांनी बांगड यांचे अनधिकृत अतिक्रमण पाडावे असे म्हणणे आहे तर तहसीलदार शिवानंद बिडवे यांनी हे काम नगर पालिका मुख्याधिकारी यांचे असल्याचे सांगून हात झटकले आहेत. तहसीलदार आणि नगर पालिका मुख्याधिकारी एकमेकांवर जबाबदारी ढकलून मोकळे होते आहेत आणि शहरात अनधिकृत अतिक्रमण वाढत चालले आहेत.