धाराशीव – शेतजमिनीची हद्द कायम करण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच मागून, तडजोडीअंती २ हजार रुपये स्वीकारताना वाशी येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील आवक-जावक लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी रंगेहाथ पकडले. दिगंबर मारुती ढोले (वय ४५) असे अटक करण्यात आलेल्या लिपिकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ५५ वर्षीय तक्रारदाराने त्यांच्या आईच्या नावावर असलेल्या मौजे वाशी येथील गट क्रमांक ४४४ मधील शेतजमिनीची मोजणी करून हद्द कायम करण्याकरिता उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, वाशी येथे अर्ज दिला होता. या अर्जानुसार, भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक दिगंबर ढोले यांनी ७ मे २०२५ रोजी तक्रारदाराच्या शेतजमिनीची मोजणी केली होती. त्यानंतर, जमिनीच्या हद्दी कायम करण्याच्या खुणा करण्यासाठी ढोले यांनी तक्रारदाराकडे ३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
याप्रकरणी तक्रारदाराने २३ मे २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धाराशीव येथे तक्रार दाखल केली. एसीबीने २६ मे रोजी या तक्रारीची पडताळणी केली असता, ढोले यांनी पंचांसमक्ष ३ हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती २ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले आणि ही रक्कम २७ मे रोजी घेऊन येण्यास सांगितले.
त्यानुसार, आज, २७ मे २०२५ रोजी लावण्यात आलेल्या सापळ्यात, लिपिक दिगंबर ढोले याने तक्रारदाराकडून पंचांसमक्ष २ हजार रुपयांची लाच स्वीकारताच त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. ढोले याच्या अंगझडतीत लाचेची रक्कम २ हजार रुपये आणि एक ओप्पो कंपनीचा मोबाईल आढळून आला आहे. त्याच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
आरोपी दिगंबर ढोले (रा. गणेश मेडिकलच्या समोर, दत्तात्रय राऊत यांचे घरी भाडेत्तत्वावर, तालुका वाशी, जिल्हा धाराशीव. मूळ रा. हदगाव, तालुका पाथरी, जिल्हा परभणी) याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्याला अटक करण्यात आले आहे. आरोपीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजी नगरचे पोलीस अधीक्षक श्री संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक श्री मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली, धाराशीव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक विकास राठोड आणि त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार आशिष पाटील, विशाल डोके, जाकेर काझी व चालक पोलीस नाईक दत्तात्रय करडे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
भ्रष्टाचारासंबंधित कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा पोलीस अधीक्षक, लाप्रवि छत्रपती संभाजी नगर (९९२३०२३३६१) व पोलीस उपअधीक्षक, लाप्रवि धाराशीव (९५९४६५८६८६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीतर्फे करण्यात आले आहे.