धाराशिव: तालुक्यातील गोवर्धनवाडी येथे गिरणीचे पीठ घरात येत असल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका २१ वर्षीय विवाहितेसह तिच्या सासूला जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पाच जणांविरोधात ढोकी पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अंकिता दत्ता शिंदे (वय २१, रा. गोवर्धनवाडी) यांनी ढोकी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दि. ९ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास, आरोपी अमोल बाबासाहेब पांचाळ, बाबासाहेब दासु पांचाळ, वनिता अमोल पांचाळ, मनोज भजनदास नरवटे, आणि सिमा मनोज नरवटे (सर्व रा. गोवर्धनवाडी) यांनी गैरकायद्याची मंडळी जमवली.
‘तुमच्या गिरणीचे पीठ आमच्या घरात येते’ असे म्हणत आरोपींनी फिर्यादी अंकिता शिंदे व त्यांच्या सासूला जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच, सर्वांनी मिळून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
या तक्रारीवरून १५ ऑक्टोबर रोजी ढोकी पोलीस ठाण्यात पाचही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १८९(२), १८९(१), १९१(२), ३५१ (२)(३), ७६ सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.