धाराशिव: विमा पॉलिसीचा हप्ता भरण्याच्या बहाण्याने एका विमा कंपनीच्या प्रतिनिधीने महिलेला २६ हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना धाराशिव शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, निर्मजा बस्वेश्वर नगरे (वय ४८, रा. समर्थनगर, धाराशिव) यांनी श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या धाराशिव शाखेतून विमा पॉलिसी घेतली होती. कंपनीचा प्रतिनिधी किरण पाचपोर (रा. नागपूर, ह.मु. धाराशिव) याने ८ नोव्हेंबर २०२४ रोजी श्रीमती नगरे यांच्याकडून पॉलिसीचा हप्ता भरण्यासाठी ४५,००० रुपये घेतले. त्यावेळी “कंपनीचे सर्व्हर डाउन आहे,” असे कारण सांगून त्याने त्यांना एका कच्च्या पावतीवर रक्कम घेतल्याची नोंद करून दिली.
मात्र, आरोपी पाचपोर याने ही रक्कम कंपनीत न भरता स्वतःकडे ठेवली. काही दिवसांनी श्रीमती नगरे यांनी विचारणा केली असता, त्याने १९,००० रुपये परत केले, परंतु उर्वरित २६,००० रुपये देण्यास टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर निर्मजा नगरे यांनी अखेर ८ जून २०२५ रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी किरण पाचपोर विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(५) आणि ३१८(४) अन्वये फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.