धाराशिव – शहरातील जुना उपळा रोडवर डुकराला वाचवण्याच्या प्रयत्नात भरधाव स्कुटी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रोड रोलरवर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात ३५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. , याप्रकरणी स्कुटी चालकावर आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुनम स्वप्निल कोकाटे (वय ३५, रा. सिध्दीविनायक अपार्टमेंट, शांतीनिकेतन कॉलनी, धाराशिव) असे मृत महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मयत पुनम कोकाटे या त्यांचे दीर संदीप दिलीप कोकाटे यांच्यासोबत स्कुटीवरून (क्र. एमएच २५ बीडी ७८३५) जात होत्या. शांतीनिकेतन कॉलनीतील जुना उपळा रोडवर समोर अचानक डुक्कर आल्याने, त्याला वाचवण्याच्या नादात चालक संदीप कोकाटे यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे त्यांची स्कुटी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रोड रोलरला जाऊन धडकली.
या अपघातात मागे बसलेल्या पुनम कोकाटे या गंभीर जखमी झाल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.याप्रकरणी मयत पुनम यांचे पती स्वप्निल दिलीप कोकाटे (वय ४०) यांनी ७ जुलै रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून, हयगयीने आणि निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक संदीप दिलीप कोकाटे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १०६, १२५(अ), आणि १२५(ब) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
बेंबळीजवळ मोटारसायकल अपघात, एकाचा मृत्यू; निष्काळजी चालकावर गुन्हा दाखल
धाराशिव – महाळंगी ते आंबेवाडी रस्त्यावर निष्काळजीपणे मोटारसायकल चालवल्याने झालेल्या अपघातात एका ३४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात मोटारसायकल चालक स्वतःही जखमी झाला असून, त्याच्यावर बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल पांडुरंग कुदळे (वय ३४, रा. सारोळा, ता. जि. धाराशिव) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चालक बापु गणपती सावंत (रा. चिखली, ता. जि. धाराशिव) याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बापु सावंत हा विशाल कुदळे याला आपल्या मोटारसायकलवर (क्र. एमएच २५ बीसी ५८२६) बसवून महाळंगी-आंबेवाडी रस्त्यावरून जात होता. यावेळी आंबेवाडी शिवारात त्याने हयगयीने व निष्काळजीपणे वाहन चालवल्याने अपघात झाला. या अपघातात मागे बसलेला विशाल कुदळे गंभीर जखमी होऊन मयत झाला, तर चालक बापु सावंत हा देखील जखमी झाला.
याप्रकरणी मृत विशाल याचे भाऊ अमर पांडुरंग कुदळे यांनी ७ जुलै रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चालक बापु सावंत विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १०६ आणि १२५(अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बेंबळी पोलीस करत आहेत.
निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालवणे जीवावर बेतले; चारीत पलटी होऊन चालकाचा मृत्यू
अनाळा येथे रस्त्याच्या कडेला खोदलेल्या चारीत ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, याप्रकरणी मृत चालकावरच अंबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दिपक दत्तु खराडे (रा. बोरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे मृत ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपक खराडे हे आपला ट्रॅक्टर (क्र. एमएच ४५ एस १०९१) हयगयीने व निष्काळजीपणे चालवत होते. अनाळा गावातील राहुल जाधव यांच्या घरासमोरून जात असताना, पाणी जाण्यासाठी खोदलेल्या चारीमध्ये त्यांचा ट्रॅक्टर पलटी झाला. यात ते ट्रॅक्टरच्या स्टेअरिंगमध्ये अडकून गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेप्रकरणी सचिन बिरमल तरंगे (वय ३५, रा. भालेवाडी, ता. करमाळा) यांनी ७ जुलै रोजी अंबी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून, मृत चालक दिपक खराडे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१ आणि १०६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अंबी पोलीस पुढील तपास करत आहेत.