धाराशिव: शहरात रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौकात अश्लील हावभाव करत नाचणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तीव्र संताप व्यक्त होत होता. या घटनेनंतर आता महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. संतप्त शिवभक्तांनी अखेर त्या तरुणाला शोधून काढले असून, त्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आणून जाहीर माफी मागायला लावली आहे.
काय घडले होते?
रविवारी रामनवमी उत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत डीजेच्या तालावर काही तरुण बेभान होऊन नाचत होते. मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली असता, एका तरुणाने अंगातील शर्ट काढून अत्यंत अश्लील हावभाव करत नाचण्यास सुरुवात केली. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. यामुळे शिवप्रेमी आणि सामान्य नागरिकांमधून तीव्र संतापाची लाट उसळली होती. धार्मिक उत्सवात आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या दैवताच्या पुतळ्यासमोर अशा असभ्य वर्तनावर टीकेची झोड उठली होती.
पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह:
या संपूर्ण प्रकारावेळी उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप नागरिकांनी केला होता. डीजेच्या आवाजाची मर्यादा ओलांडली जात असतानाही कोणतीही कारवाई न केल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
शिवभक्तांची कारवाई आणि तरुणाची माफी:
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संतप्त झालेल्या शिवभक्तांनी आणि काही तरुणांनी या अश्लील वर्तन करणाऱ्या तरुणाचा शोध सुरू केला. त्याला शोधून काढल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणण्यात आले. तेथे त्याला त्याच्या कृत्याची जाणीव करून देत सार्वजनिकरित्या माफी मागायला सांगण्यात आले. अखेर त्या तरुणाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली.
या प्रकरणामुळे सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः धार्मिक आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या स्थळांजवळ सभ्यतेचे आणि नियमांचे पालन करणे किती आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. तरुणाने माफी मागितल्याने सध्या तरी या वादावर पडदा पडला असला तरी, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे.
ही बातमी सर्वप्रथम दिल्याबद्दल शिवभक्तांनी धाराशिव लाइव्हचे आभार मानले आहेत.
Video