धाराशिव: वाशी तालुक्यातील एका २३ वर्षीय तरुणाला येडशी उड्डाणपुलाजवळ अडवून पाच जणांच्या टोळक्याने लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात तरुण जखमी झाला असून, आरोपींनी त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली. ही घटना २१ जुलै रोजी घडली असली तरी, याबाबत ९ ऑगस्ट रोजी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अविनाश हरीदास मोराळे (वय २३, रा. वडजी, ता. वाशी) असे जखमी तरुणाचे नाव आहे.
अविनाश मोराळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते २१ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास येडशी उड्डाणपुलाजवळून जात होते. यावेळी आरोपी विक्की चव्हाण, स्वप्नील पौळ, यश माने (तिघेही रा. तेरखेडा, ता. वाशी), सुरज अवधुत (रा. अवधुत वाडी, ता. वाशी) आणि पांडु जाधवर (रा. रत्नापुर, ता. वाशी) यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून अविनाश यांना अडवले. आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी आणि लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात अविनाश जखमी झाले. इतकेच नाही, तर आरोपींनी त्यांना जिवे ठार मारण्याची धमकीही दिली.
या मारहाणीमागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. अविनाश मोराळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून धाराशिव ग्रामीण पोलिसांनी पाचही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार (कलम 118(1), 115(2), 352, 351, 189, 190, 191) गुन्हा नोंदवला आहे. यात बेकायदेशीर जमाव जमवणे, मारहाण करणे, धोकादायक शस्त्राने हल्ला करणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.