धाराशिव – शहरात गुरुवारी (दि. ५ जून ) सायंकाळी उधारीवर कटिंग करण्यास नकार दिल्याने सलून कर्मचारी तरुणावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पीडित तरुण ऋतुराज बालाजी मोरे (वय १८) याचा जबाब पोलिसांनी नोंदवला असून, आरोपी बबलू सूर्यवंशी याने हल्ला केल्यानंतर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचे जबाबात म्हटले आहे.
पीडित ऋतुराज मोरे याने रुग्णालयातून पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, तो गुरुवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मेन रोडवरील ‘न्यू क्लासिक जेंट्स पार्लर’मध्ये काम करत होता. त्यावेळी बबलू सूर्यवंशी (रा. सावित्रीबाई फुले सोसायटी, धाराशिव) हा दारूच्या नशेत दुकानात आला. “माझी कटिंग आता कर, मी पैसे देणार नाही, उधार कर,” असे तो म्हणाला.
ऋतुराजने त्याला, “तुमच्यापुढे तीन गिऱ्हाईक आहेत, तुमचा नंबर नंतर लागेल,” असे समजावण्याचा प्रयत्न केला. याचा राग आल्याने बबलूने पाठीमागून ऋतुराजला शिवीगाळ करत ढकलून दिले. त्यानंतर त्याने खिशातून लोखंडी धारदार फायटर काढून ऋतुराजच्या मानेच्या वर, डोक्याच्या मधोमध पाठीमागून जोरदार वार केला. या हल्ल्यात ऋतुराज गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळला आणि त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला.
हल्ला केल्यानंतर आरोपी बबलू सूर्यवंशी एवढ्यावरच थांबला नाही. “जर तू पोलिसात तक्रार दिली, तर मी तुझ्यावर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची अशी धमकी देऊन तो पळून गेला. पळून जाताना “मी भीमनगरचा रहिवासी आहे,” असेही तो म्हणाल्याचे ऋतुराजने जबाबात नमूद केले आहे.
घटनेनंतर दुकानातील लोकांनी ऋतुराजचा मामा आणि दुकान मालक सचिन चौधरी यांना फोन करून माहिती दिली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ऋतुराजला शासकीय रुग्णालयात दाखल केले.
याप्रकरणी, आरोपी बबलू सूर्यवंशी याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पीडित तरुणाने केली आहे. पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला असून, फरार आरोपीचा शोध सुरू केला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी जोर धरत आहे.
याप्रकरणी आरोपी बबलू सूर्यवंशी याच्यावर धाराशिव शहर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम ११८ ( १ ), ३५२, ३५१ ( २ ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.