धाराशिव – तालुक्यातील प्रसिद्ध रामलिंग तीर्थक्षेत्री गाडी पार्किंगच्या शुल्कावरून झालेल्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याच रात्री १५ जणांच्या टोळक्याने घरी घुसून त्या तरुणावर लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला वाचवण्यासाठी आलेल्या आई आणि बाळंतीण बहिणीलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलिसांत ‘टायगर ग्रुप’शी संबंधित १५ गुंडांवर ॲट्रॉसिटीसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, घटना घडून पाच दिवस उलटूनही आरोपी मोकाट असल्याने संताप व्यक्त होत आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येडशी येथील संकेत धनाजी कदम (वय २१) हा तरुण सोमवार, दि. ११ ऑगस्ट रोजी रामलिंग मंदिरात दर्शनासाठी गेला होता. तिथे कृष्णा लोमटे, शंकर गडकर आणि राहुल गडकर यांनी त्याला अडवून पार्किंगचे पैसे मागितले. “मी स्थानिक असून स्थानिकांना पार्किंग शुल्क आकारले जात नाही,” असे संकेतने सांगितले. याचा राग आल्याने आरोपींनी, ” तुझ्या कपाळावर येडशीचा शिक्का मारलाय का? तुमच्या समाजाने देवधर्म कशाला करायचा?” अशी जातीवाचक शिवीगाळ करत तुषार शहाजी शिंदे याच्या मदतीने संकेतला मारहाण केली.
रात्री घरी येऊन प्राणघातक हल्ला
पैसे न दिल्याच्या रागातून त्याच रात्री ११ वाजण्याच्या सुमारास, दारूच्या नशेत असलेल्या १५ गुंडांच्या टोळक्याने संकेतच्या रामलिंग नगर येथील घरी धडक दिली. या टोळक्यात तुषार शिंदे, गोटू मोरे, अजय भोसले, शंकर गडकर, कृष्णा लोमटे यांच्यासह इतरही सामील होते. त्यांनी घरात घुसून झोपलेल्या संकेतला बाहेर ओढले आणि लोखंडी रॉड व धारदार शस्त्रांनी त्याच्या डोक्यावर, मानेवर आणि जांघेत गंभीर वार केले.
आई आणि बाळंतीण बहिणीलाही मारहाण
आरडाओरडा ऐकून संकेतची आई मीराबाई आणि बाळंतीण बहीण साक्षी मस्के त्याला वाचवण्यासाठी धावल्या. तेव्हा हल्लेखोरांनी त्या दोघींनाही सोडले नाही. आईला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली आणि त्यांच्या चेहऱ्यावर थुंकून “तुमची लायकी हीच आहे,” असे म्हणत त्यांचा विनयभंग केला. बाळंतीण असलेल्या बहिणीला देखील चापटीने मारहाण करण्यात आली.
आरोपी अद्याप मोकाट
या अमानुष हल्ल्यानंतर संकेत कदमने दिलेल्या तक्रारीवरून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात तुषार शिंदे आणि इतर १४ जणांविरोधात भारतीय न्याय संहिता आणि ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, घटना घडून पाच दिवस उलटले तरी अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही, ज्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परिसरातील ‘टायगर ग्रुप’च्या या वाढत्या झुंडशाहीला वेळीच आवर घालण्याची मागणी नागरिक करत आहेत.